Corona Virus: धोक्याचा इशारा! कोरोनाची चौथी लाट केव्हा येणार? IIT Kanpur च्या वैज्ञानिकांनी सांगितली तारीख!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 03:39 PM2022-02-27T15:39:27+5:302022-02-27T16:00:23+5:30

चौथी लाट 4 महिन्यांपर्यंत चालेल, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग मंदावला आहे. असे असतानाच वैज्ञानिक मंडळी आता चौथ्या लाटेचे गणित मांडू लागले आहेत. भारतात कोविडची पुढची म्हणजेच चौथी लाट 22 जूनच्या आसपास येईल आणि ती 24 ऑक्टोबरपर्यंत राहील, असे IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

आयआयटी संशोधकांनी यापूर्वी कोरोना लाटेसंदर्भात लावलेले सर्व अंदाज जवळजवळ खरे ठरले आहेत. महत्वाचे म्हणजे, चौथी लाट 4 महिन्यांपर्यंत चालेल, असे या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

ओमिक्रॉन नंतरची ही चौथी लाट किती घातक असेल हे नवीन प्रकार आणि किती लोकांचे लसीकरण झाले आहे, तसेच किती लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे, यावर अवलंबून असेल, असेही वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

खरे ठरले आहेत आधीचे आकडे - देशातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असतानाच तिसरी लाट हलकी पडत चालली आहे. आता आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी पुढील लाटेच्या वेळेचे कॅलक्युलेशन केले आहे. MedRxiv मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, भारतात कोरोनाची चौथी लाट 22 जूनच्या आसपास येईल आणि ती 24 ऑक्टोबरपर्यंत चालेल.

तत्पूर्वी, देशात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येईल, यानंतर केसेस कमी होऊ लागतील, अशी भविष्यवाणी आयआयटी कानपूरच्या अभ्यासात करण्यात आली होती. ही आकडेवारी डिसेंबर महिन्यातच प्रसिद्ध झाली होती. या आकडेवारीत थोडा फारच फरक आहे आणि ते जवळजवळ खरे ठरले आहेत.

ऑगस्टमध्ये येणार पीक - अहवालानुसार, वैज्ञानिकांनी सांगितले की, चौथी लाट 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान पीकवर असेल. यानंतर केसेस कमी व्हायला सुरुवात होईल.

Omicron च्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वैज्ञानिकांनी आधीच म्हटले आहे की, हा व्हेरिअंट म्हणजे कोरोनाचा शेवटचा प्रकार नव्हता. नवा व्हेरिअंट यायला वेळ लागू शकतो, पण येणे निश्चित आहे. सायंटिस्ट मारिय वान करखोफ यांनी सांगितले की, वैज्ञानिक सातत्याने कोरोना व्हायरसचे म्यूटेशन ट्रेस करत आहेत.