Zepto Success Story : १९ वर्षाच्या मुलानं उभी केली ७३०० कोटींची कंपनी, हिट झाली १० मिनिटांची आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 02:09 PM2023-06-08T14:09:53+5:302023-06-08T14:34:29+5:30

अवघ्या १९ वर्षाच्या मुलानं ७३०० कोटींची कंपनी स्वतःच्या बळावर उभी केली आहे असं सांगितलं तर कदाचित तुमचा यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

ज्या वयात मुलं आपला वेळ मित्रांसोबत फिरण्यात, गप्पा मारण्यात आणि फिल्म्स पाहण्यात घालवतात. त्या वयात एका मुलानं मात्र कोट्यवधींची कंपनी उभी केली. एका 19 वर्षाच्या मुलानं 7300 कोटींची कंपनी स्वतःच्या बळावर उभी केली आहे असं सांगितलं तर कदाचित तुमचा यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

ज्या वयात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांकडून पॉकेटमनी मागता, त्या वयात हा मुलगा 1200 कोटी कमावतोय. एका हिट कल्पनेने कैवल्य वोहराचं नशीब बदललं. कैवल्य हा ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरी अॅप झेप्टोचा (Zepto) सह-संस्थापक आहे. केवळ 19 वर्षांचा असताना त्याने झेप्टोची सुरूवात केली होती.

कैवल्य वोहरा हा मुंबईचा रहिवासी आहे. कैवल्यनं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेला, परंतु अभ्यासापेक्षा त्याला स्टार्टअप्समध्ये अधिक रस होता.

कैवल्यने वयाच्या 17 व्या वर्षी त्याचा मित्र आदित पलिचासोबत पहिला स्टार्टअप सुरू केलं. त्यांनी आपल्या स्टार्टअपचे नाव GoPool ठेवले. शिक्षणासोबतच कंपनी चालवणे अवघड होत होते, त्यामुळे तो शिक्षण सोडून मुंबईला परत आला.

झेप्टो सुरू करण्याची कल्पनाही या दोघांना कॉलेजमध्ये असतानाच आली. जेव्हा तो कोणतेही सामान मागवायचा तेव्हा ते घरापर्यंत पोहोचायला किमान दोन दिवस लागायचे. यामुळे त्याला काही तासांतच लोकांपर्यंत सामान पोहोचवणारी एक कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली.

त्यामुळे त्यानं 2021 मध्ये कोरोना महासाथीच्या काळात झेप्टोची सुरुवात केली. कंपनीची सुरुवात मुंबईतील 1000 कर्मचारी आणि डिलिव्हरी एजंट्ससह करण्यात आली होती.

यांच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, सुरुवातीला दोघांनी किराणाकार्ट या ग्रॉसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्मची सुरूवात केली. ते 45 मिनिटांत किराणा सामान पोहोचवत होते. पिक-अप पॉईंटच्या जवळ राहणाऱ्या ग्राहकांना 15 मिनिटांत डिलिव्हरी दिली जात होती. या प्लॅटफॉर्मवर हे ग्राहक पुन्हा पुन्हा येऊ लागले. यानंतर त्यांच्या मनात विचार आला की 10 मिनिटांत वस्तू का देता येत नाहीत?

त्यानंतर झेप्टोचा जन्म झाला. आदित पालिचानं कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली तर आणि कैवल्य वोहरा याने मुख्य चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरची जबाबदारी हाती घेतली. दोघांनी अनेक गुंतवणूकदारांकडून पैसा उभा केला.

आपल्याला मोठे अपार्टमेंट, उत्तम दर्जाची आणि जलद वितरण सेवा हवी आहे याची जाणीव त्यांना संशोधनातून झाली. त्यांनी डार्क स्टोअर नावाच्या मायक्रो डिस्ट्रिब्युशन नेटवर्क सेंटरद्वारे त्यांची सेवा सुरू केली. ग्राहकांना शक्य तितक्या लवकर माल पोहोचवला जावा, हा त्याचा उद्देश होता. त्यासाठी सरासरी अंतर दोन किलोमीटरच्या आत ठेवण्यात आले होते.

"सुरुवातीला काही लोकांनी आम्हाला गांभीर्याने घेतले नाही. आम्ही तरुण होतो, कल्पना धाडसी होती आणि आम्ही आमच्या वयाच्या दुप्पट असलेल्या गुंतवणूकदारांशी बोलत होतो. आमच्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठीही हा एक मजेदार अनुभव होता,” असं आदितनं सांगितलं. आमचा योगायोग चांगला होता की आम्हाला काही चांगले गुंतवणूकदार मिळाले. आमची कल्पना जाणून घेतल्यानंतर त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, असंही त्यांनी नमूद केलं.