कंम्प्युटर कॅफेत केलं काम, १४ व्या वर्षी उद्योजक; सर्वात तरुण सीईओ, सुहास गोपीनाथ यांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 08:18 AM2023-11-24T08:18:24+5:302023-11-24T08:31:58+5:30

सुहास गोपीनाथ यांनी आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी कंपनी सुरू केली.

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशाचं शिखर गाठता येतं असं म्हणतात. यश हे वय पाहून मिळत नाही. यंगेस्ट सीईओ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुहास गोपीनाथ यांची कहाणीही अशीच आहे.

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी कंपनीचा पाया रचला आणि तीन वर्षांनी कंपनीची व्यावसायिक स्थापना केली. आज ते ग्लोबल्स इंकचे सीईओ आणि अध्यक्ष म्हणून ओळखले जातात.

सुहास गोपीनाथ यांचं नाव आज जगभरात ओळखीचं झालं आहे. Globals Inc. ही प्रत्यक्षात एक मल्टीनॅशनल आयटी कंपनी आहे, जी मोबाईल आणि सायबर सुरक्षा उत्पादनांची निर्मिती करते. सुहास गोपीनाथ यांना जगातील सर्वात तरुण सीईओ होण्याचा मान मिळाला आहे.

आपल्या शालेय जीवनापासूनच सुहास यांना कंम्प्युटरमध्ये अतिशय रस होता. कम्प्युटर नसल्यानं त्यांना शिकता येत नव्हतं, परंतु त्यांनी यातून मार्ग काढला आणि कम्प्युटर शिकले. १३ व्या वर्षी त्यांना आपली कंपनी सुरू करायची होती, परंतु वयाची १८ वर्षे न झाल्यानं त्यांना करता आली नाही.

कायद्यानं त्यांना याची मान्यता मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे ग्लोबल इनकॉर्पोरेशनची स्थापना केली. यामुळे ते सर्वात कमी वयाचे सीईओ बनले.

सुहास गोपीनाथ यांनी २०१० मध्ये दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बिल गेट्स यांची भेट घेतली होती. गोपीनाथ यांना तंत्रज्ञानाच्या जगात पूर्वीपासूनच फार रस होता.

सुहास गोपीनाथ हे नववीत शिकत असताना फ्रीलान्स वेब डिझायनर म्हणून काम करू लागले. अनेक लोकांसाठी मोफत वेबसाइट तयार केल्या. या दरम्यान, सुहास यांनी प्रथमच १०० डॉलर्स कमावले, ज्यामुळे त्याचा उत्साह वाढला आणि पुढच्याच वर्षी स्वतःची कंपनी सुरू केली.

गेल्या दोन दशकांत ग्लोबल्स इंक कॉर्पोरेशन ही बहुराष्ट्रीय कंपनी बनली आहे. या कंपनीची उत्पादनं जगातील अनेक देशांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीच्या शाखा ब्रिटेन, इटली, स्पेन, अमेरिका येथे आहेत.

टेक्निकल सेवा पुरवण्यात ही आघाडीची कंपनी मानली जाते. कंपनीचे कर्मचारी त्यांच्या कौशल्य आणि उत्कृष्टतेसाठी ओळखले जातात. आजच्या काळात कंपनीची व्हॅल्यू १.०१ बिलियन डॉलर्स झाली आहे. कंपनीत सध्या शंभरहून अधिक कर्मचारी आहेत.