Adani Wikipedia Share Market : अदानींवर विकिपीडियाचा खुलासा, शेअर बाजार आपटला; ४० हजार कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 03:18 PM2023-02-22T15:18:49+5:302023-02-22T15:27:09+5:30

हिंडेनबर्ग रिपोर्टचे प्रकरण अद्याप थंड झालेले नाही, तर दुसरीकडे आणखी एका खुलाशाने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून दिली.

२४ जानेवारीनंतर अदानी समूहाच्या अडचणीत वाढ होत आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टचे प्रकरण अद्याप थंड झालेले नाही, तर दुसरीकडे आणखी एका खुलाशाने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून दिली. खरं तर, मंगळवारी, विश्वकोश विकिपीडियाने अदानींवर हल्लाबोल केला आणि अनेक गंभीर आरोप केले.

त्यानंतर बुधवारी अदानी समूहाचे शेअर्स १२ टक्क्यांपर्यंत घसरले. अब्जाधीश गौतम अदानी यांचे सर्व कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली आले. त्यापैकी बहुतांश कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किटही लावण्यात आले.

अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल ४० हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. यासह गौतम अदानी जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत २७ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांची संपत्ती ४६.१ अब्ज डॉलरवर आली आहे.

निरनिराळ्या प्लॅटफॉर्म्सवर जवळपास एक दशकापासून अदानी समूहाबद्दल अतिशयोक्तीने लिहिल्याचा आरोप विकीपीडियाने केला आहे. विकिपीडियाने यासाठी 'सॉक पपेट' देखील वापरले आहे.

अहवालानुसार, ४० हून अधिक 'सॉक पपेट' किंवा अज्ञात पेड लेखकांनी अदानी कुटुंब आणि कौटुंबिक व्यवसायांवर नऊ लेख लिहिले किंवा संपादित केले. यापैकी अनेकांनी अनेक लेख संपादित केले आणि तटस्थ नसलेले साहित्य जोडल्याचे त्यांनी म्हटले. विकिपीडियाने सांगितले की या 'सॉक पपेट्स'वर नंतर बंदी घालण्यात आली किंवा ब्लॉक करण्यात आले.

'सॉक पपेट' इंटरनेटवर सक्रिय अशा बनावट खात्यांना म्हणतात, जे ब्लॉग, फोरम, विकिपीडिया आणि फेसबुक किंवा ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा वापर एखाद्या व्यक्तीच्या किंवा समस्येच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी करतात. विकिपीडियाने आरोप केला आहे की यापैकी काही 'सॉक पपेट्स' कंपनीचे कर्मचारी आहेत आणि त्यांनी तटस्थ नसलेली सामग्री जोडण्याचे आणि माहितीवरील विकिपीडियाचे डिस्क्लेमर काढून टाकण्याचे काम केले आहे.

बुधवारी, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमध्ये १३ टक्क्यांपर्यंत घसरले. कंपनीचे शेअर्स १३८७ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. अदानी पोर्टचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून ५५४.१० रुपयांवर आले.

याशिवाय अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी विल्मर यांचे शेअर ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, एसीसी लिमिटेडचे ​​शेअर्स ५.३९ टक्क्यांनी घसरून १७२९.३० रुपयांवर आले होते. तर अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये ५.३९ टक्क्यांची घसरण होऊन ते ३३४.७५ रुपयांवर आले. याशिवाय NDTV शेअरमध्येही लोअर सर्किट लागले होते.