‘ही’ सरकारी कंपनी झाली TATA समूहाची, वृत्त समजताच शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 04:40 PM2022-07-05T16:40:54+5:302022-07-05T16:46:13+5:30

कंपनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सोमवारी पूर्ण करण्यात आली. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत झाली मोठी वाढ.

टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स (TSLP) या टाटा समुहाच्या कंपनीने सरकारी मालकीची नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) या कंपनीचं अधिग्रहण केलं. सोमवारी अधिग्रहणाची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अर्थ मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. या बातमीनंतर टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्सनं 4 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली होती.

कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्सचा शेअर 4.12 टक्क्यांनी वाढून 596.1 रूपयांवर आला होता. यापूर्वी सोमवारी अखेरच्या सत्रात हा शेअर 572.50 रूपयांवर बंद झाला होता. 3.96 टक्क्यांच्या तेजीसह हा शेअर 593.60 रूपयांवर खुला झाला.

टाटा समूहाची कंपनी NINL साठी बोलीमध्ये विजयी झाल्यानंतर 10 मार्च रोजी शेअर खरेदीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्या करारानुसार ऑपरेशनल क्रेडिटर्स, कर्मचारी आणि विक्रेत्यांच्या थकबाकीशी संबंधित अटी पूर्ण करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली.

दरम्यान, सरकारचा या कंपनीत कोणताही हिस्सा नसल्यामुळे या विक्रीतून सरकारी तिजोरीत कोणतीही भर पडणार नाही. ओडिशातील कलिंगनार येथील NINL च्या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता 11 लाख टन आहे. मात्र, सततच्या तोट्यामुळे मार्च 2020 पासून हा प्लांट बंद आहे.

टाटा स्टीलने सोमवारी सांगितले की कंपनी नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) चे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी वेगाने काम करेल. पुढील काही वर्षात त्याची क्षमता 4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष होईल.

ओडिशातील वार्षिक दहा दशलक्ष टन स्टील प्लांटचे अधिग्रहण पूर्ण केल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात, टाटा स्टीलने सांगितले की, एनआयएनएलने 2030 पर्यंत त्यांची क्षमता वार्षिक 10 दशलक्ष टनपर्यंत वाढवण्याची योजना देखील आखली आहे.