Tata ने रचला इतिहास; TCS चे बाजारमूल्य १३ लाख कोटींवर, Reliance च्या काहीच पाऊल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:01 PM2021-08-17T18:01:44+5:302021-08-17T18:08:55+5:30

रतन टाटांच्या TCS चे बाजारमूल्य १३ लाख १२ हजार ९९६ कोटींवर पोहोचले असून, मुकेश अंबानीच्या Reliance पासून काहीच पाऊले दूर आहे.

आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. तसेच टाटा आता नवनव्या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये टाटा ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

आता देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने नवा इतिहास रचला. टीसीएसचा शेअर नवीन उच्चांकावर पोहोचला.

TCS च्या बाजारमूल्याने स्टॉकमध्ये पहिल्यांदा १३ लाख कोटींचा टप्पा ओलांडला. टेक महिंद्रा, कॉफोर्ज, टीसीएस, मायंडट्री, एमफॅसिसमध्ये खरेदी झाल्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांकाने १ टक्क्यांहून अधिक उडी घेतली.

बाजारमूल्यानुसार देशातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी TCS चा हिस्सा सेन्सेक्समध्ये १.३९ टक्क्यांनी वाढून ३,५२० रुपयांच्या सर्व उच्चांकावर पोहोचला. बीएसईवर हा स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने बाजारमूल्य १३.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

रतन टाटांच्या TCS चे बाजारमूल्य १३ लाख १२ हजार ९९६ कोटींवर पोहोचले असून, मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजपासून काही पाऊले दूर आहे. Reliance इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य १३.८९ लाख कोटी रुपये आहे. मार्केट कॅपमध्ये TCS दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीला एप्रिल ते जून या महिन्यांत म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ९ हजार ००८ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, तो २८ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर अमेरिकेतील आमचा व्यवसाय, बीएफएसआय आणि किरकोळ व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. यामुळे कोरोना काळातही कंपनीची स्थिती मजबूत असल्याचे दिसत आहे. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या अन्य सहकार्यांनी याला उत्तम योगदान दिले.

ज्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत, असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. TCS ने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत भरघोस नफा कमावला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा नफा २८.५ टक्क्यांनी वाढून तब्बल ९ हजार ००८ कोटी रुपये झाला आहे.

गतवर्षी याच कालावधीत कंपनीला ७ हजार ००८ कोटींचा नफा झाला होता. तर, चालू आर्थिक वर्षात कंपनीचे एकत्रित उत्पन्नही १८.५ टक्क्यांनी वाढून ४५,४११ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गतवर्षी याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न ३८,३२२ कोटी रुपये होते.

TCS ही TATA ग्रुपची देशातील सर्वांत मोठी खासगी कंपनी आहे आणि त्यात ५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कंपनी कॅम्पसमधून ४० हजार फ्रेशर्स घेणार आहे.

गेल्या वर्षीही कंपनीने ४० हजार फ्रेशर्सची कॅम्पस हायरिंग केली होती. TCS मधून नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही खूप कमी आहे. या कंपनीचा कर्मचारी कायम ठेवण्याचा दर ८.६ टक्के आहे, जो देशातील सर्वांत कमी आहे.

कोरोना संकटाच्या काळात अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद होत असताना TCS ने मात्र सुमारे २० हजार ४०९ नवीन नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या. यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ०५ लाख ०९ हजार ०५८ वर गेली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात टीसीएस कॉलेज कॅम्पसमधून ४० हजारांहून अधिक फ्रेशर्सना संधी देणार असल्याची माहिती मिळाली आहे.