सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 02:50 PM2024-05-20T14:50:00+5:302024-05-20T14:54:07+5:30

जगभरातील युद्ध आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमती अनेकदा वाढतात. आता पुन्हा तशीच परिस्थिती झाल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर कमी झाले होते, आता पुन्हा एकदा सोन्याचे वाढू शकतात. आज इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला, यानंतर मध्यपूर्वेत तणाव निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. या भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत एक टक्का वाढ झाली आहे.

सध्या, सोन्याची स्पॉट किंमत २४३५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे, तर जूनमध्ये गोल्ड फ्यूचर २,४४४.५५ प्रति औंस डॉलर या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. यामुळे आता सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आज मुंबईत लोकसभा निवडणुकीमुळे शेअर बाजार बंद आहे, तर कमोडिटी मार्केट संध्याकाळी ५ वाजता उघडेल.

दरम्यान, एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इब्राहिम रायसी यांच्या मृत्यूशिवाय अमेरिकेत व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे.

जगभरातील युद्ध आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमतीत अनेकदा वाढ झालेली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली होती.

सध्या सोने आणि चांदी विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहेत. यामुळे आता मध्यपूर्वेत तणाव वाढला तर तो आणखी वाढू शकतो.

इराणमधील या घटनेनंतर मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. हा ताण वाढल्याने सोन्या-चांदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या, सोने २४३५ डॉलरच्या पातळीवर वाढीसह व्यवहार करत आहे. २४२० डॉलर आणि २४०० डॉलर हे सोन्यासाठी महत्त्वाचे खरेदी समर्थन आहेत.

एमसीएक्स मार्केटमध्ये सोन्याला ७३२०० आणि ७२७०० या पातळीवर महत्त्वाचा सपोर्ट आहे. मोठा रेजिस्टेंस ७४००० ते ७४५०० रुपये आहे. १७ मे रोजी सराफा बाजारात सोन्याची स्पॉट किंमत ७३,३८७ रुपये होती.