SBI Student Loan: अत्यंत कमी व्याजदरात १.५ कोटी रुपयांपर्यंत कर्ज देतेय SBI बँक!, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:41 PM2022-05-25T12:41:10+5:302022-05-25T12:51:23+5:30

SBI Student Loan: घर किंवा कार खरेदीसाठीच कर्जाची आवश्यकता भासते असं अजिबात नाही. अनेक जण उच्च शिक्षणासाठीही कर्ज घेतात. मग कमीत कमी व्याजदरात कोणती बँक शैक्षणिक कर्ज देतेय ते जाणून घेऊयात..

उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशातील शिक्षणाचा खर्च प्रत्येकाल परवडतोच असं नाही. मग अशावेळी शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून बँका विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टूडंड लोनची माहिती आपण जाणून घेऊयात..

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून ओळख असलेल्या SBI कडून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करुन दिलं जातं. आपल्या देशात होम लोनपासून कार लोनपर्यंत आणि पर्सनल लोनपासून एज्युकेशन लोनपर्यंत सर्व गरजांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कर्ज मिळवता येतं.

SBI च्या एज्युकेशन लोनबाबत माहिती जाणून घेण्याआधी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे हे कर्ज फक्त आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमधून पदवी, पदव्युत्तर शिक्षण, डिग्री आणि डिप्लोमा यांसारख्या कोर्ससाठीच दिलं जातं. याशिवाय टीचर ट्रेनिंग, नर्सिंग कोर्स, पायलट ट्रेनिंग, शिपिंग ट्रेनिंग यांसारख्या कोर्ससाठीही एज्युकेशन लोन मिळवता येतं.

इतकंच नाही, तर तुम्ही परदेशात राहून MCA, MBA, MS, CIMA आणि CPA यांसारखे कोर्स करणार असाल तर यातही SBI कडून तुम्ही कर्ज मिळवू शकता.

SBI स्टूडंट लोनच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अत्यंत माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन दिलं जातं. एखादी विद्यार्थिनी किंवा महिला उच्च शिक्षणासाठी कर्ज घेत असेल तर त्यात तिला व्याजदरात 0.50 टक्के सूट देखील देण्यात येते.

७.५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी बँकेला कोणत्याही पद्धतीची तारण सुरक्षा सादर करावी लागत नाही. २० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही पद्धतीची प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. तर २० लाखापेक्षा अधिकच्या रकमेसाठी १० हजार रुपये आणि कर आकारला जातो.

कर्जाची परतफेड तुमचं संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच सुरू होते. शिक्षण किंवा कोर्स पूर्ण झाल्यानंतर पुढील १५ वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जातो. यासोबतच १२ महिन्यांसाठी परतफेड सूटही दिली जाते.

चार लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतंही अतिरिक्त व्याज आकारण्यात येत नाही. SBI स्टूडंट लोन अंतर्गत विद्यार्थी १.५ कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकतात. तुम्ही जर भारतात शिक्षण घेत असाल तर ५० लाख आणि परदेशात शिक्षण घेत असाल तर १.५० कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

SBI स्टूडंट लोनचे व्याजदर ८.६५ टक्के इतकं आहे. तर विद्यार्थिनी आणि महिलांसाठी ८.१५ टक्के इतका व्याजदर आहे. SBI स्टूडंट लोनबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. याशिवाय तुमच्या नजिकच्या एसबीआय बँकेच्या शाखेत जाऊन माहिती प्राप्त करू शकता.