पैशांची मोठी चणचण, पगार थकले, टाटांची कंपनी बंदच होणार होती; पण ‘ही’ महिला धावून आली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 07:39 PM2023-02-23T19:39:10+5:302023-02-23T19:43:56+5:30

टाटांची कंपनी अगदी बंद करण्याची वेळ आली होती. मात्र, एका महिलेमुळे कंपनी वाचली आणि आज यशोशिखरावर आहे. जाणून घ्या...

आताच्या घडीला रतन टाटा यांचा टाटा समूह शानदार फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेविध क्षेत्रात टाटाच्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. केवळ कार्यरत नाही, तर कमाल कामगिरी करताना दिसत आहेत. टाटा समूह दिवसेंदिवस कार्यविस्तारही करताना दिसत आहे. केवळ भारतीय बाजारात नाही, तर शेअर मार्केटमध्येही टाटाच्या कंपन्यांना मोठा दबदबा आहे.

देशभरातील कोट्यवधी घरांमध्ये दररोज अनेकविध वस्तू टाटांच्या कंपनीतील वापरल्या जातात. देशातील अगदी लहानग्या मुलापासून ते अगदी वयोवृद्ध माणसाच्या तोंडी टाटाचे नाव असल्याचे देशभरात पाहता येऊ शकते. मात्र, सर्वच दिवस सारखे नसतात, या उक्तीप्रमाणे टाटांवरही आपली एक कंपनी बंद करण्याची वेळ आली होती.

एक काळ असा होता की, टाटा समूहातील एक कंपनी अगदी बंद करण्याची वेळ आली होती. पैशांची मोठी चणचण भासत होती. कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते. काय करावे हे काहीच सूचत नव्हते. एका यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी महिलेचा हात असतो असे बोलले जाते. हीच गोष्ट देशातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक टाटांच्या यशामागे तंतोतंत ठरली. टाटा ग्रुपसाठी एका महिलेचे मोठे योगदान आहे.

टाटा समूहातील या कंपनीच्या यशामागे ज्या महिलेचे नाव आहे त्या महिलेला अनेकजण ओळखतही नसतील. मात्र, या महिलेने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे टाटाची कंपनी केवळ वाचली नाही, तर आताच्या घडीला जगभरात या कंपनीच्या नावाचा डंका असल्याचे सांगितले जाते. ती महिला कोण होती, टाटांची कंपनी कशी वाचली, जाणून घेऊया...

या महिलेचे नाव लेडी मेहरबाई टाटा असे आहे. लेडी मेहरबाई टाटा यांनी टाटा ग्रुपच्या वाईट काळात आपले स्त्रीधन गहाण ठेवले होते. एकेकाळी टाटा ग्रुपची एक कंपनी आर्थिक संकटात होती. ती म्हणजे TATA Steel. त्यावेळी लेडी मेहरबाई टाटा यांनी या कंपनीला वाईट काळातून बाहेर काढले. मेहरबाई यांनी दागिने बँकेत गहाण ठेवून पैसे जमवले आणि टाटा स्टीलला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

प्रसिद्ध लेखक हरीश भट्ट यांनी आपल्या Tata Stories: 40 Timeless Tales To Inspire You पुस्तकात लेडी मेहरबाई यांनी टाटा स्टीलला संकटातून कसे बाहेर काढले याबाबत सविस्तर लिहिले आहे. जमशेदजी टाटा यांचे मोठे पुत्र सर दोराबजी टाटा यांच्या त्या पत्नी होत्या. सर दोराबजी टाटा यांनी आपल्या पत्नीसाठी लंडनच्या व्यापाऱ्याकडून २४५.३५ कॅरेट हिरा खरेदी केला होता.

हा हिरा इतका महागडा होता, की याची १९०० च्या दशकात किंमत जवळपास १,००,००० पाउंड होती. पण नंतर पडत्या काळात १९२४ मध्ये अशी वेळ आली, की लेडी मेहरबाई यांना आपला मौल्यवान हिरा विकण्याचा निर्णय घ्यावा लागला.

या काळात टाटा स्टीलकडे पैशांची अतिशय चणचण होती. कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीचेही पैसे नव्हते. त्यावेळी लेडी मेहरबाई पुढे आल्या आणि त्यांनी जुबली डायमंडसह आपली संपत्ती बँकेत गहाण ठेवली. लेडी मेहरबाई यांच्या या निर्णयानंतर टाटा स्टीलने यशाची नवी शिखरे गाठली.

आज टाटा ग्रुपच्या या कंपनीचे नाव देशासह जगभरात प्रसिद्ध आहे. त्यानंतर हा हिरा विकून सर दोराबजी टाटा ट्रस्टची निर्मिती करण्यात आली. टाटा स्टील कंपनीवर इतके मोठे संकट येऊनही त्यांनी कंपनीतून कर्मचाऱ्यांना कमी केले नव्हते. तसेच त्यांचे पगारही दिले.