Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:23 PM2024-05-08T12:23:47+5:302024-05-08T12:43:38+5:30

Akshaya Tritiya Gold Purchasing Tips: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. यावर्षी अक्षय्य तृतीया १० मे रोजी आहे. सोनं खरेदी करताना ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

Akshaya Tritiya Gold Puchasing Tips: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. यावर्षी अक्षय्य तृतीया १० मे रोजी आहे. या निमित्तानं अनेक जण सोने खरेदी करतील. आजच्या काळात हॉल मार्किंग असलेलं सोनं विकत घ्यावं हे बहुतेकांना माहीत आहे, पण हॉलमार्किंग खरं की खोटं? हे कसं ओळखावं, ते आज आपण पाहू.

सोन्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बीआयएस केअर अॅप इन्स्टॉल करावं लागेल. यानंतर अॅप ओपन करा आणि त्यात तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी टाका. ओटीपीद्वारे त्याचं व्हेरिफिकेशन करा. व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही अॅपचा वापर करू शकता.

याच्या फीचर्समध्ये गेल्यावर तुम्हाला 'व्हेरिफाय एचयूआयडी'चा पर्याय मिळेल. या फीचरच्या मदतीनं तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. अॅपमध्ये हा नंबर टाकताच हॉलमार्किंग खरं की बनावट हे तुमच्यासमोर स्पष्ट होईल.

बिलावर एचयूआयडी (HUID) कोड लिहिणं बंधनकारक नाही, अशा स्थितीत आपण ज्या स्टोअरमधून सोनं खरेदी करत आहात त्या स्टोअरमध्ये HUID कोड मागू शकता. लक्षात ठेवा हॉलमार्किंगच्या वेळी प्रत्येक दागिन्यांना एकच एचयूआयडी क्रमांक दिला जातो. म्हणजेच एकाच एचयूआयडी क्रमांकाचे दोन दागिनं असू शकत नाहीत.

जर तुम्ही अलीकडचे दागिने खरेदी केले असतील, पण तरीही तुम्ही त्यावर समाधानी नसाल किंवा तुम्ही आयएसआय मार्क असलेली दुसरी वस्तू खरेदी केली असेल पण तुम्ही त्याच्या गुणवत्तेवर समाधानी नसाल तर तुम्ही या अॅपच्या माध्यमातून त्याबद्दल तक्रार ही करू शकता. यासाठी तुम्हाला 'Complaints' या पर्यायावर जावे लागेल.