Multibagger Stock : 'या' शेअरनं १ लाखांचे केले ९३ लाख, आता कंपनी ४००% डिविडंट देणार; गुंतवणूकदारांना सोन्याचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 09:50 AM2022-11-14T09:50:02+5:302022-11-14T09:58:48+5:30

Multibagger Stock : या कंपनीचं नाव सर्व घरांमध्ये परिचित आहे. आता या कंपनीनं गुंतवणूकदारांना दिला मोठा परतावा.

Multibagger Stock : एफएमसीजी कंपनी (FMCG company) इमामी लिमिटेडने जुलै-सप्टेंबर 2022 तिमाही निकालांसह त्याच्या भागधारकांसाठी 400 टक्के डिविडंट जाहीर केला आहे. विशेष बाब म्हणजे हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असतील तर त्याचं मूल्य 92 लाख रुपये झाले असते.

20,511 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली इमामी लिमिटेड ही FMCG उद्योगातील लार्जकॅप कंपनी आहे. इमामी लिमिटेड हे बोरोप्लस, नवरत्न, फेअर अँड हँडसम, झंडू बाम, मेन्थो प्लस बाम, फास्ट रिलीफ आणि केश किंग यासह अनेक मोठे ब्रँड असलेले नाव आहे. तसेच, इमामी लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य वैयक्तिक आणि आरोग्य सेवा कंपन्यांपैकी एक आहे.

इमामी लि.चा स्टॉक दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. 15 नोव्हेंबर 2002 रोजी बीएसईवर कंपनीचा स्शेअर 5 रुपये होता, जो आता 11 नोव्हेंबर 2022 रोजी 464.35 रुपयांवर बंद झाला आहे. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी इमामीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचं मूल्य 92.87 लाख रुपये झाली असती.

परंतु गेल्या एका वर्षामध्ये या शेअरच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळाले आहेत. एका वर्षात 13 टक्के आणि 2022 मध्ये 11 टक्क्यांची घसरण दिसून आली. परंतु सहा महिन्यांत यात 6 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की संचालक मंडळाने 11 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत 1 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या इक्विटी शेअर्ससाठी 400 टक्के म्हणजेच प्रति शेअर 4 रुपये डिविडंट जाहीर केला आहे. होल्डिंग कंपनीने 21 नोव्हेंबर 2022 ही अंतरिम डिविडंटसाठी पात्र शेअरधारकांचा निर्णय घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे.

कंपनीने सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 807.36 कोटी रुपयांच्या निव्वळ विक्री नोंदवली आहे. यात 3.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 777.1 कोटी रुपयांची निव्वळ विक्री झाली होती. तथापि, कंपनीचा EBITDA 29.5 टक्क्यांनी घसरून 195.38 कोटी रुपये झाला. इमामी लि. निव्वळ नफा 184.18 कोटी रुपयांवर स्थिर राहिला.