Mukesh Ambani Property: मुकेश अंबानींचे साम्राज्य कोण कोण सांभाळणार? वॉल्टन परिवाराच्या निर्णयाचा अभ्यास करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 04:58 PM2021-12-09T16:58:05+5:302021-12-09T17:08:48+5:30

Mukesh Ambani Property: मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये आहेत. इशा, अनंत आणि आकाश. अंबानींकडे सध्या जगभरातील 1000 हून अधिक कंपन्या आहेत. आता या कंपन्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

देशाची सर्वात मोठी कंपनी बनलेल्या रिलायन्स इंड्रस्ट्रीजचा डोलारा सांभाळण्याासाठी पुढची पीढी तयार करण्याची तयारी मुकेश अंबानी करत आहेत. 2005 मध्ये मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात कंपन्या विभागल्या गेल्या होत्या. यापैकी एक भाऊ उत्तूंग शिखरावर पोहोचला तर दुसरा रसातळाला गेला आहे. आता आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी त्यांची अब्जावधींची संपत्ती, कंपन्यांची आपल्या मुलांमध्ये विभागणी करणार आहेत.

मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये आहेत. इशा, अनंत आणि आकाश. अंबानींकडे सध्या जगभरातील 1000 हून अधिक कंपन्या आहेत. आता या कंपन्यांचा उत्तराधिकारी कोण कोण होणार, कोणाकडे कोणती कंपनी दिली जावी, यावर अंबानी विचार करत आहेत. मुकेश अंबानींची ही संपत्ती 94 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड आहे. तर त्यांच्या कंपन्यांचे साम्राज्य हे 208 अब्ज डॉलर.

जगातील सर्वात मोठी मार्केट कंपनी असलेल्या वॉलमार्टच्या वॉल्टन फॅमिलीने आपल्या संपत्तीची वाटणी केली होती. वॉलमार्टचा पसारा रिलायन्स पेक्षा जास्त आहे. यामुळे मुकेश अंबानी ही वाटणी कशी केली गेली याकडे लक्ष देणार आहेत. कारण 64 वर्षे वयाच्या अंबानींना आता त्यांची संपत्ती, कंपन्या तीन मुले आणि पत्नी यांच्याकडे हळूहळू सोपवाव्या लागणार आहेत.

या साऱ्या घडामोडींशी संबंधित एका बड्या अधिकाऱ्याने ब्ल्यूमबर्गला याची माहिती दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्री ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीच्या अधिपत्याखाली इतर अनेक कंपन्या येतात. यामध्ये परदेशातील कंपन्या आणि व्यवसायही येतो.

एवढी प्रचंड संपत्ती आपल्या आणि कंपन्यांची जबाबदारी विभागण्याचे मोठे जिकिरीचे काम मुकेश अंबानी यांना करावे लागणार आहे. सध्या या समुहामध्ये नीता अंबानी, इशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे समभाग आहेत. गेल्या दहा वर्षांत अंबानींच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.

अंबानी यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही, तसेच त्यांनी रिलायन्सचे अध्यक्षपद किंवा कोणतीही जबाबदारी सोडण्याचा विचार केलेला नाही. परंतू ते आपल्या मुलांना प्रकाशझोतात आणत आहेत. जूनमध्ये शेअरहोल्डरना संबोधित करताना मुकेश अंबानी यांनी याचे संकेत दिले आहेत.

आकाश, इशा (वय 30) आणि अनंत (26) हे तिघे यापुढे कंपन्यांमध्ये वेगवेगळी भूमिका निभावण्यास सुरुवात करतील असे ते म्हणाले होते. याचाच अर्थ मुकेश अंबानींनी आपल्या साम्राज्याचा गाडा पुढे सुरु ठेवण्याची तजवीज सुरु केली आहे.

धीरुभाई अंबानी यांनी 1973 मध्ये रिलायन्सची स्थापना केली होती. ही कंपनी एवढे मोठे साम्राज्य बनले आहे. परंतू 2002 मध्ये या साम्राज्याचा सम्राट कोण यावरून वाद झाला. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यात 2005 मध्ये अखेर कंपन्यांची वाटणी झाली.

एका उर्जा निर्मिती प्रकल्पाच्या घोषणेवरून ठिणगी उडाली होती. दोन्ही भाऊ त्या आधी एकत्रच काम करत होते. मुकेश अंबानींशी कोणतीही चर्चा न करता अनिल यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. यावर मुकेश यांनी नाराजी व्यक्त केली आणि वादाला सुरुवात झाली. दोघांच्याही सहीने सारे काही व्यवहार होत होते. परंतू अनिल यांनी फायनान्शिअल स्टेटमेंटवर सही करण्यास नकार दिला. यानंतर संपत्तीच्या वाटण्या होईस्तोवर वाद सुरु होते.

Read in English