Reliance Jio कडून मुंबईत 5G सेवांची चाचणी सुरू; पाहा यानंतर पुण्यासह कोणत्या शहरांचा लागणार नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:36 PM2021-06-16T13:36:53+5:302021-06-16T13:48:52+5:30

Reliance Jio 5G: मुंबईमध्ये रिलायन्स जिओकडून 5G सेवांची चाचणी करण्यात आली सुरू. लवकरच अन्य शहरांमध्येही चाचणीला होणार सुरूवात.

रिलायन्स जिओनं मुंबईत आपल्या 5G सेवांच्या चाचणीला सुरूवात केली आहे. या प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या एका अधिकाऱ्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मुंबईत रिलायन्स जिओकडून स्वत:च्या उपकरणांचा वापर करत ही चाचणी सुरू करण्यात आली आहे. तर मुकेश अंबानी याची कंपनी भविष्यात सॅमसंग, एरिक्सन आणि नोकिया या कंपन्यांच्या मदतीनं अन्य शहरांमध्ये 5G सेवांची चाचणी सुरू करणार आहे.

डीओटीकडून चाचणीसाठी स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर लवकरच नेटवर्क लाईव्ह केलं जाईल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर दिली. इकॉनॉमिक टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आम्ही मीड आणि mmwave बँड्सचा वापर करून मुंबईत 5G सेवांची चाचणी करत आहोत. जिओद्वारे वापरण्यात येणारी 5G सेवांसाठी उपकरणं भारतातच तयार करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

स्पर्धकांच्या तुलनेत मुंबईत मोठ्या प्रमाणात आम्ही 5G ची चाचणी सुरू करणार आहोत. आम्ही लवकरच अन्य शहरांमध्येही ही चाचणी सुरू करू, असंही त्यांनी नमूद केलं.

रिलायन्स जिओनं दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद या ठिकाणी 5G सेवांच्या चाचणीसाठी अर्ज केला आहे. यासंदर्भात जिओला एक क्वेरीही पाठवण्यात आली आहे. परंतु त्याचं उत्तम मिळालेलं नाही.

Department of Telecommunications (DoT) ने नुकतेच 5G सेवांच्या चाचणीसाठी स्पेक्ट्रम जारी केले आहेत.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांसाठी डीओटीनं 700 MHz, 3.5 GHz आणि 26 GHz बँड जारी केले आहेत.

रिलायन्स जिओनं एन्ड टू एन्ड 5G स्टॅक, 5G रेडिओ आणि कोर नेटवर्क सोल्युशन विकसित केलं आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी यापूर्वी 5G रेडिओ आणि कोअर सोल्युशनची चाचणी पूर्ण केली आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्स 5G डिव्हाईस कॉन्फिगरेशनच्या स्टँडर्डायझेशनसाठी Original Equipment Manufacturers (OEMs) सोबत करार केला आहे.

रिलायन्स जिओपूर्वी भारती एअरटेलनंदेखील 5G सेवांची चाचणी सुरू केली आहे. एअरटेलनं गुरुग्राम येथील सायबर हबमध्ये 5G सेवांच्या चाचणीची तयारी केली आहे. यासाठी कंपनीनं एरिक्सन या कंपनीशी भागीदारी केली आहे.

एअरटेल सध्या 3500MHz बँडच्या माध्यमातून ही चाचणी करत असून याद्वारे 1GBPS पर्यंत स्पीड देण्यात येतो. एअरटेलला दिल्ली एनसीआर, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये चाचणीसाठी स्पेक्ट्रम देण्यात आले आहेत.