१०,००० ₹ च्या मासिक गुंतवणुकीसह किती वर्षांत बनाल कोट्यधीश? PFF की म्युच्युअल काय आहे बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 03:54 PM2023-02-24T15:54:51+5:302023-02-24T16:02:02+5:30

केवळ गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो आणि तुमचे भांडवल वाढू शकते.

पैसा कमवायचा असेल तर तुमच्याकडे संयम असणं आवश्यक आहे. भविष्यात तुम्हाला भरपूर पैसे हवे असतील तर तुम्हाला तुमचे पैसे आधी कुठेतरी गुंतवावे लागतील. केवळ गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो आणि तुमचे भांडवल वाढू शकते.

यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेत पैसे गुंतवू शकता, जमीन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता किंवा बाजारातही गुंतवणूक करू शकता. आर्थिक सल्लागार दीप्ती भार्गव यांच्या मते, आजच्या काळात म्युच्युअल फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड यांसारख्या अनेक योजना आहेत, ज्यावर कंपाऊंडींगचा लाभ मिळतो आणि संपत्तीतही लवकर वाढ होते.

तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपी तसेच पीपीएफ योजनेद्वारे 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जर तुमच्याकडे मोठी रक्कम गुंतवण्याची क्षमता असेल, तर या योजनांद्वारे तुम्ही काही वर्षांत कोट्यधीशही बनू शकता. PPF किंवा म्युच्युअल फंड या दोन्हीपैकी कोणती योजना तुम्हाला लवकरच कोट्यधीश बनवू शकते हे जाणून घेऊ.

तुमच्याकडे मासिक 10,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची क्षमता असल्यास, तुम्ही काही वर्षांत कोट्यधीश होण्याचे तुमचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता. यासाठी, जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे पैसे गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 1,20,000 रुपये गुंतवावे लागतील. म्युच्युअल फंडामध्ये सरासरी 12 टक्के नफा मिळतो आणि काहीवेळा यापेक्षाही चांगला परतावा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पण जरी तुम्ही 12 टक्क्यांप्रमाणे बघितले तरी, तुम्ही 20 वर्षे सतत दरमहा 10,000 रुपये जमा केले तर तुम्ही एकूण 24,00,000 रुपये गुंतवाल आणि तुम्हाला 75,91,479 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे, 20 वर्षांनंतर, तुम्हाला एकूण 99,91,479 रुपये मिळतील, जे अंदाजे 1 कोटी आहेत. तुम्ही आणखी 1 वर्ष गुंतवणूक सुरू ठेवल्यास, तुम्ही एकूण 25,20,000 गुंतवाल, तुम्हाला रु. 88,66,742 व्याज मिळतील आणि 21 वर्षांनंतर तुम्ही एकूण 1,13,86,742 रुपये कमवू शकाल.

दुसरीकडे, जर आपण पीपीएफबद्दल बोललो, तर या सरकारी योजनेवर तुम्हाला परताव्याची हमी मिळते. ज्यांना धोका पत्करायचा नाही, ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात. PPF ही 15 वर्षांची योजना असली तरी कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये ती किमान तीन वेळा वाढवावी लागेल. सध्या या योजनेवर 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.

तुम्ही या योजनेत दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही वार्षिक 1,20,000 रुपये गुंतवाल. कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला ही गुंतवणूक 28 वर्षे चालू ठेवावी लागेल. 28 वर्षांमध्ये तुमची 33,60,000 रुपयांची गुंतवणूक असेल, ज्यावर तुम्हाला 71,84,142 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि तुम्ही एकूण 1,05,44,142 रुपये कमवाल. दुसरीकडे, तुम्ही संपूर्ण 30 वर्षे ते सुरू ठेवल्यास, तुम्हाला 1,23,60,728 रुपये मिळतील. (टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)