आता Post Office मधूनही मिळणार स्वस्त Home Loan; पाहा काय आहे योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:42 PM2021-10-26T15:42:15+5:302021-10-26T15:55:54+5:30

१.९० लाख बँकिंग सर्व्हिस प्रोवायडर्सकडून Home Loan चा लाभ घेता येणार. पाहा काय आहे योजना.

ग्राहकांना होम लोन घेण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागतो. परंतु आता भारतीय पोस्टानं ग्राहकांना चांगली सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी बँकिंग सुविधा पोहोचणं कठिण आहे अशा ठिकाणच्या ग्राहकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payment Bank-IPPB) आणि एचडीएफसी लिमिटेड (HDFC Limited) आयपीपीबीच्या जवळपास ४.७ कोटी ग्राहकांना होम लोनचा लाभ देण्यासाठी रणनितीक भागीदारी करण्याची घोषणा केली आहे.

इंडिया पोस्ट (India Post) देशभरातील ग्राहकांना एचडीएफसीचं होम लोन उपलब्ध करून देण्यासाठी ६५० शाखा आणि १ लाख ३६ हजारांपेक्षा अधिक बँकिंग अॅक्सेस पॉईंट्सच्या आपल्या देशव्यापी नेटवर्कची मदत घेणार आहे. दरम्यान, यासाठी एका एमओयूवर स्वाक्षरीही करण्यात आली.

विशेषत: बँक नसलेल्या किंवा बँकिंग सेवा पोहोचू शकत नसलेल्या नसलेल्या भागात HDFC चं होम लोन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचं आयपीपीबीनं एका निवेदनाद्वारे सांगितलं. ज्यांना शक्य होत नसेल त्यांना आपल्या मालकीच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

IPPB सुमारे १,९०,००० बँकिंग सेवा प्रदात्यांद्वारे- पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांद्वारे गृहकर्ज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

करारानुसार, सर्व गृहकर्जांसाठी क्रेडिट, तांत्रिक आणि कायदेशीर मूल्यमापन, प्रक्रिया आणि वितरण हे एचडीएफसी लिमिटेडद्वारे हाताळलं जाईल, तर आयपीपीबी कर्जाच्या सोर्सिंगसाठी जबाबदार असेल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

आर्थिक समावेशनासाठी कर्जाची उपलब्धता आवश्यक आहे कारण कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकांच्या महत्त्वपूर्ण वर्गाला गृहकर्ज देत नाही. डिजिटली सक्षम एजंट बँकिंग चॅनल वापरण्यासाठी आणि ग्राहकांच्या सर्व बँकिंग गरजांसाठी IPPB एक-स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून स्थापित करायचं असल्याची प्रतिक्रिया आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक जे वेंकटरामू यांनी दिली.

स्थापनेनंतर IPPB नं इनोव्हेटिव्ह आणि युनिक बँकिंग प्रोडक्ट्स सादर केले आहेत आणि निरनिराळ्या सेगमेंट्समध्ये आपल्या ग्राहकांना सेवा देत आहेत.

यामध्ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate), आधारमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करणं, व्हर्च्युअल डेबिट कार्ड (Virtual Debit Card), आधार अनेब्ल्ड पेमेंट सिस्टम सर्व्हिस (Aadhar enabled Payment System Service) आणि डाक पे यूपीआय अॅप ( Dak Pay UPI App) यांचा समावेश आहे.