एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...

By हेमंत बावकर | Published: June 17, 2024 05:25 PM2024-06-17T17:25:48+5:302024-06-17T17:39:53+5:30

MG Gloster Black Storm Review : खऱ्या एसयुव्ही कशा असतात? याचा अनुभव दबंग, नेतेमंडळी आणि बडी असामी आदीच घेतात असे नाही. तर या एसयुव्हींचा मालक होण्याचे स्वप्न पाहणारेही एक ना एक दिवस नक्कीच घेतात.

सध्या भारतीयांना एसयुव्हींचे वेड लागले आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी छोट्या एसयुव्ही बाजारात आणायला सुरुवात केली आहे. आजच्या घडीला सर्वच कंपन्यांकडे या मिनी एसयुव्ही आहेत. परंतु, खऱ्या एसयुव्ही कशा असतात? याचा अनुभव दबंग, नेतेमंडळी आणि बडी असामी आदीच घेतात असे नाही. तर या एसयुव्हींचा मालक होण्याचे स्वप्न पाहणारेही एक ना एक दिवस नक्कीच घेतात. आम्ही याच खऱ्या एसयुव्हींमधील डार्क हॉर्स, अत्युच्च प्रिमिअम श्रेणीचा अनुभव देणाऱ्या एमजी ग्लोस्टर ब्लॅक स्टॉर्मची जवळपास ४०२ किमी राईड घेतली. पहा कशी वाटली.

भारतीयांना पहिली इंटरनेट कार देणारी ही कंपनी. या कंपनीची सर्वात महागडी आणि मोठी सात सीटर एयसुव्ही आम्ही अगदी शहरी रस्त्यांवरून ते खेडेगावातील दगडगोट्याच्या रस्त्यांवही पळविली. यावेळी अनेकांच्या नजरा या कारकडे लक्ष वेधून घेताना आम्हाला दिसल्या. सस्पेंशन अगदी गलबतासारखे, एकदम स्मूथ. खड्डा असो की उंच सखल भाग आतमध्ये तुम्हाला दणके सोडा मऊशार गादीसारखे फील होते.

मोठी टचस्क्रीन, सातही सीटसाठी मागेपर्यंत एसी व्हेंट्स, फॉलो मी लँम्प, सुरक्षेसाठी एअरबॅग्स, अडास आदी सुविधा होत्याच परंतू ड्रायव्हर सीटला मसाजरही होता. बसून बसून कंबर दुखत असेल तर कार चालवत असतानाच मसाजर तुमचा थकवा कुठल्याकुठे दूर करेल. व्हेंटिलेटेड सीट्सही या कारमध्ये होत्या.

महत्वाचे म्हणजे सातही सीट्स कंफर्टेबल होत्या. तिसऱ्या रोची सीट लावलेली असली तरी पाठीमागे बॅगा ठेवण्यासाठी पुरेशी जागा होती. खूप मोठ्या बॅगा ठेवता येत नसल्या तरी छोट्या छोट्या डफल बॅग आरामात ठेवता येतात. दरवाजांमध्ये प्रवासासाठी पुरेशा पाण्याच्या बॉटल ठेवण्याची सोय आहे. तसेच गॉगल होल्डर, आर्मरेस्टमध्ये पुरेशी जागा देण्यात आलेली आहे.

या एसयुव्हीला 2.0 L 4-cylinder diesel इंजिन होते. याची ताकदच एवढी होती की कुठेही पिकअपमध्ये लॅग जाणवला नाही. ट्रॅफिक असेल किंवा चढ कुठेही या कारने कच खाल्ली नाही. या कारचा टँक 75 L एवढा मोठा आहे. परंतू मायलेज मात्र तुलनेने कमी आहे. अर्थात श्रीमंतांसाठी आणि कारची ताकद आणि आवाका पाहता ८.८ ते ९ किमी प्रति लीटरचे मायलेज ठीक आहे. कदाचित 4X4 असल्याने जास्त इंधन लागत असेल. फ्युअल वाचविण्यासाठी ट्रॅफिक, सिग्नलवर इंजिन स्टार्ट स्टॉप फंक्शन देण्यात आले आहे.

कारचा लूक एकदम नवा, सिंपल सोबर आणि लक्षवेधक आहे. पूर्ण ब्लॅक आणि काही पार्टवर रेड असे कलर कॉम्बिनेशन असल्याने रस्त्यावरून धावताना हा डार्क हॉर्सच वाटत होता. संपूर्ण काळा रंग असल्याने तो मेन्टेन ठेवणे देखील गरजेचे आहे. आतमध्ये ६४ Ambient Light Colour बदलता येतात. सनरूफ खुप मोठा आहे.

MG Gloster Black Storm मध्ये ३६० डिग्री कॅमेरा आहे. यामुळे एवढी मोठी कार पार्क करणे, मागे पुढे करणे सोपे जाते. परंतू, या कॅमेराची क्वालिटी थोडी हलकी वाटली. स्पष्टता नसल्याने काही गोष्टी या ब्लर किंवा नाहीतच अशा वाटतात. याकडे कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे. काहीसे मायलेजमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. बाकी लाईटचा थ्रो एकदम चांगला होता. दरवाजे ओढले तर ते बाऊंसबॅक होत होते, लागत नसल्याने पुन्हा पुन्हा उघडून जोराने लावावे लागत होते. बाहेरील आवाज आत येऊ नये म्हणून रबर इन्सुलेशनमुळे तसे होत असावे.

टीपीएमएस उत्तम रित्या काम करत होती. रिमोट सनरुफ, एसी ऑन ऑफ, विंडो ओपन क्लोज योग्यरित्या काम करत होते. Hill Descent Control ही उत्तम रित्या काम करत होता. म्युझिक सिस्टिमचा आवाज देखील चांगला होता. या कारमध्ये १२ स्पीकर देण्यात आले आहेत.

एखाद्याला इतरांपेक्षा वेगळी, प्रिमिअमनेस कार घ्यायची असेल तर ही कार एक चांगली निवड ठरू शकते. शहरात आणि हायवेवर मायलेजमध्ये तसा फारसा फरक दिसला नाही. यामुळे ज्यांचे दोन्ही ठिकाणी, कामानिमित्त नेहमी शहराबाहेर, लांबच्या पल्ल्यांचा प्रवास असेल तर ही कार एक चांगला पर्याय आहे.

आपल्याकडे खऱ्या एसयुव्हींचा कमी पर्याय आहे. त्यातही आरामदायी एसयुव्ही देखील कमी आहेत. एवढे मोठे इंजिन, वेग आणि त्यात बसलेली व्यक्ती आदी गोष्टी पाहता सुरक्षा तर खूपच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या कारमध्ये सहा एअरबॅग आहेत, लेन असिस्ट फिचर्स, रडार आदी चांगले काम करते. ज्येष्ठ व्यक्ती, महिलांसाठी एवढ्या उंच कारमध्ये बसण्यासाठी त्रास होतो. यासाठी फुटरेस्ट देण्यात आला आहे. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची यात काळजी घेण्यात आली आहे.