TATA साठी २०२१ शानदार! Air India ची घरवापसी; नवी EV कंपनी अन् सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 09:45 AM2021-12-27T09:45:19+5:302021-12-27T09:55:11+5:30

वैश्विक स्तरावर आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेल्या रतन टाटा यांच्या TATA ग्रुपसाठी २०२१ वर्ष खूपच दमदार ठरले. जाणून घ्या, डिटेल्स...

सन २०२१ हे वर्ष अनेकांसाठी विविध स्वरुपाचे गेले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक, वर्षसरताना असलेली ओमायक्रॉन व्हेरिएंटची दहशत यामुळे अनेकविध क्षेत्रांसाठी सन २०२१ हे वर्ष संमिश्र ठरले. मात्र, वैश्विक स्तरावर आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेल्या रतन टाटा यांच्यासाठी मात्र हे वर्ष खूपच दमदार ठरले.

TATA ग्रुपच्या अनेकविध कंपन्यांनी भारतीय बाजारापासून ते शेअर मार्केटपर्यंत आपला दबदबा कायम ठेवला. काही कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा मोठी कामगिरी करत गुंतवणूकदारांनाही मालामाल केले.

TATA ग्रुपच्या टाटा मोटर्सने (Tata Motors) ऑटोमोबाईल बाजारात मोठा गेम खेळला. इलेक्ट्रिक वाहनांना पेट्रोल, डिझेल वाहनांपासून वेगळे करत नवीन कंपनी काढली आहे. यासाठी कंपनीने ७०० कोटी रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे टाटाच्या इलेक्ट्रीक गाड्या ही नवीन कंपनी बनविणार आहे.

टाटाच्या संपूर्ण मालकीच्या नव्या कंपनीचे नाव TPEML टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड असे आहे. टाटने सांगितले की, मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. कंपनी १० रुपये प्रत्येक शेअरच्या दराने ७० कोटी इक्विटी शेअरची अधिकृत रक्कमेसोबत सहभागी करण्यात आले आहे. जे एकूण ७ अब्ज रुपये होते. हे सर्व शेअर आणि रक्कम टीएमएलकडे असणार आहे.

डबघाईला आलेली सरकारी विमान वाहतूक कंपनी Air India ची TATA समूहाने खरेदी केली. या व्यवहाराला भारतीय स्पर्धा आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ‘महाराजा’च्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ६७ वर्षांनी एअर इंडियाची टाटा समूहामध्ये घरवापसी झाली.

TATA सन्सची मालकी असलेल्या टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एअर इंडिया खरेदीसाठी बोली लावली होती. एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्विसेसच्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली १८ हजार कोटी रुपयांची बोली विजयी ठरली होती.

शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे मार्केट कॅप म्हणजेच बाजारमूल्य आठवडाभरात १,२९,०४७.६१ कोटी रुपयांनी वाढले. यामधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) याच काळात सर्वांत जास्त फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. का अहवालानुसार, TCS चे मार्केट कॅप ७१,७६१.५९ कोटी रुपयांनी वाढले आहे.

दरम्यान, शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या TATA ग्रुपच्या आहेत. आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत. TATA ग्रुपमधील टीसीएसनंतर टायटन कंपनीचा मार्केट कॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ऑटोमोबाइल क्षेत्राला सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्याचा गंभीर सामना करावा लागत आहे. अशातच TATA ग्रुपने मोठी योजना आखली असून, देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प उभारण्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

TATA समूह यासाठी २२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सन २०२२ पर्यंत टाटा ग्रुपचा हा सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल आणि यामुळे सुमारे ४ हजारांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.

भारतात इलेक्ट्रिक कार क्षेत्रात TATA आपला दबदबा राखून आहे. टाटा मोटर्सच्या नेक्सॉन आणि टिगॉर या इलेक्ट्रिक कार अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पायाभूत सुविधांचा असलेला अभाव यामुळे काही मर्यादा येत आहेत. यावर तोडगा म्हणून TATA ने एक मेगा प्लान आखला आहे.

TATA ग्रुपने लंडन येथील जॉनसन मॅथे हा बॅटरी लिथियमचा ब्रँड खरेदी करण्यासाठी रणनीती आखली आहे. ही कंपनी खरेदी करण्याच्या स्पर्धेत TATA समूह पुढे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीचा खरेदी करार ५२५ कोटी रुपयांमध्ये केला जाऊ शकतो.

देशातील सर्वात मोठी, खाजगी क्षेत्रातील एकात्मिक कंपनी Tata Power कंपनीने देशभरात १ हजार पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे (EV) चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क उभारले आहे. देशभरातील सर्व महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.

याशिवाय एका अहवालानुसार, रतन टाटा नोकऱ्या देण्यात आघाडीवर असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. टीसीएसने देशात सर्वाधिक नोकऱ्या दिल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. TCS ने ५.६ लाखांहून अधिक रोजगार दिले आहेत.

दुसरीकडे, TATA ने 1MG चे अधिग्रहण करून ई-फार्मसी क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. यामुळे कंपनीवरील विश्वास अनेकपटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. तर, TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुप जगातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.