साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सुबत्ता, नोकरी बदल शक्य; लक्षणीय प्रगती, अपार यशाचा शुभ काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 08:27 IST2026-01-25T08:08:44+5:302026-01-25T08:27:03+5:30
Weekly Horoscope: २५ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी आहे की, हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, तर केतु सिंह राशीत आहे. रवि, मंगळ, बुध, शुक्र आणि प्लूटो मकर राशीत आहेत. राहु कुंभ राशीत आहे. शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण मीन, मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या राशींमधून राहील. या सप्ताहात रविवारी भानुसप्तमी, रथसप्तमी आहे. सोमवारी प्रजासत्ताक दिन, दुर्गाष्टमी, भीष्माष्टमी आहे. गुरुवारी जया एकादशी, भीष्मद्वादशी, तर शुक्रवारी प्रदोष आहे.

सन २०२६ जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. अवघ्या काही दिवसात फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होईल. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीत चतुर्ग्रही योग कायम असून, यामुळे अनेक राजयोग जुळून आलेले आहेत. तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा सर्वसाधारण राहील. व्यापाऱ्यांसाठी काळ सामान्य असून व्यवसाय संथ गतीने पण स्थिर चालेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा भाग्याचा असून पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. मात्र, प्रेमसंबंधात आव्हाने उभी राहू शकतात; तुमचा जोडीदार तुमच्यापासून काहीसा दुरावण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही तणाव जाणवेल. आर्थिक आघाडीवर कमालीची सावधानता बाळगा. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधा आणि खर्चावर कडक नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक चणचण भासू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा असून एकाग्रता वाढवण्यावर भर द्यावा लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मात्र त्यांच्या कष्टाचे गोड फळ आणि अपेक्षित यश नक्कीच मिळेल.

वृषभ: हा आठवडा अतिशय उत्तम जाणार आहे. उत्साही राहाल. विनाकारण मानसिक ताण घेणे टाळा. आर्थिक बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही, पण अनावश्यक खर्चावर लगाम लावणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा असून नवीन योजना राबवल्यास मोठे यश संपादन करता येईल. नोकरीत असलेल्यांना कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे अधिक परिश्रम घेण्याची तयारी ठेवा. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा सुवर्णमय असेल; जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. वैवाहिक जीवन सुखाचे असेल आणि जोडीदाराच्या सहवासात समाधानी राहाल. एकंदरीतच, हा आठवडा आनंद आणि मनःशांती देणारा ठरेल.

मिथुन: हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा ठरेल. लक्षणीय सुधारणा झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडाल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ भागीदारीसाठी उत्तम आहे; नवीन भागीदार मिळाल्याने व्यवसायात वाढ होईल. नोकरीत कामाची छाप पडेल आणि कार्यालयात वर्चस्व वाढेल. आर्थिक नियोजन करताना विचारपूर्वक खर्च करा, जेणेकरून कोणाकडून कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. प्रेमसंबंधात मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे; संशयामुळे नात्यात दुरावा किंवा वाद निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक कलह टाळण्याचा प्रयत्न करा, विशेषतः भावंडांशी वाद घालू नका. जोडीदार नोकरी करत असेल, तर त्यांच्या प्रगतीचा लाभ तुम्हालाही मिळेल, ज्यामुळे वैवाहिक जीवन अधिक सुखकर होईल.

कर्क: हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा अतिशय लाभदायक असून आवडीच्या गोष्टींवर मनमोकळेपणाने खर्च करू शकाल. व्यापाऱ्यांना व्यवसाय विस्तारण्यासाठी या काळात मोठी गुंतवणूक करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ थोडा कमकुवत असून कामात काही अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून अभ्यासात एकाग्रता वाढेल. प्रेमसंबंधात जोडीदाराच्या अहंकारामुळे काहीसा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. विवाहित जातकांनी सासरच्या मंडळींशी संवाद साधताना संयम ठेवावा, जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत.

सिंह: या आठवड्यात अत्यंत सावधगिरीने वागणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कोणाकडूनही कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका. व्यावसायिकांना कामाच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांच्या योजना यशस्वी होतील आणि वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम असून शिक्षणात प्रगती होईल, मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्यांनी अतिआत्मविश्वास टाळला पाहिजे. प्रेमसंबंधात समाधानी असाल, तर वैवाहिक आयुष्यात जोडीदारासोबत घरगुती वस्तूंची खरेदी करण्यात वेळ घालवाल.

कन्या: हा आठवडा मध्यम राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका. प्रेमसंबंधात किरकोळ कारणावरून जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते. अशा वेळी आईचा सल्ला मोलाचा ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत. जिद्द आणि चिकाटी अपेक्षित उद्दिष्टापर्यंत घेऊन जाईल.

तूळ: हा आठवडा सावधगिरी बाळगण्याचा आहे. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. आर्थिक स्थिती संमिश्र असेल; एकीकडे धनलाभ होईल तर दुसरीकडे खर्चाचे प्रमाणही अधिक राहील. व्यावसायिक क्षेत्रात धाडसी निर्णय घेणे फायद्याचे ठरेल आणि एखादी मोठी रिस्क घेऊन यशस्वी व्हाल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनात गैरसमजांमुळे मनमुटाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रचंड रुची निर्माण होईल. वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळेल.

वृश्चिक: हा आठवडा समाधानकारक असेल. आर्थिक गुंतवणुकीतून परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल, तरीही मनातल्या भावना व्यक्त करताना संकोच वाटेल. जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे. व्यापाऱ्यांना एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीमुळे व्यवसायात मोठा नफा मिळण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा धावपळीचा असेल, पण मेहनतीचे फळ मिळेल. विद्यार्थ्यांना एखाद्या अनुभवी गुरूचे किंवा मार्गदर्शकाचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे शैक्षणिक अडचणी दूर होऊन प्रगतीचा मार्ग सुकर होईल.

धनु: हा आठवडा चढ-उतारांचा ठरेल. आरोग्याच्या तक्रारींमुळे थोडे त्रस्त राहू शकता. आरोग्याला प्राधान्य द्या. आर्थिक स्थिती मात्र मजबूत राहील आणि शेअर बाजारातून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासावर भर द्यावा लागेल. नोकरीत सुप्त गुणांना वाव मिळेल. वेगळी ओळख निर्माण होईल. प्रेमसंबंधात गैरसमजांमुळे खटके उडू शकतात, त्यामुळे पारदर्शकता ठेवा. वैवाहिक जीवनात जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल आणि त्यांच्या मदतीने नवीन कार्याचा श्रीगणेशा करू शकाल. मेहनत करण्याची तयारी ठेवा, यश तुमचेच आहे.

मकर: हा आठवडा उत्तम असेल. प्राणायाम करणे हिताचे ठरेल. आर्थिक दृष्टिकोनातून कोणताही मोठा प्रश्न उभा राहणार नाही, धनलाभाचे योग आहेत. व्यापाऱ्यांना नफा मिळेल, परंतु भागीदाराशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नोकरीत बदल करण्याचे नियोजन असेल तर आता प्रयत्न करायला हरकत नाही. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. एकमेकांसाठी वेळ काढाल. कौटुंबिक जीवनात काही लहान-मोठ्या समस्या येऊ शकतात, त्या सामंजस्याने सोडवा. अभ्यासात विद्यार्थ्यांचे मन रमेल आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे दाट संकेत आहेत.

कुंभ: हा आठवडा उत्साहाचा असेल. आर्थिक स्थिती चांगली असली तरी अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे खिसा रिकामा होऊ शकतो, त्यामुळे उधळपट्टी टाळा. व्यापारात प्रगतीसाठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा संमिश्र फळे देणारा असेल. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत बाहेर जाण्याचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात कमालीचे सामंजस्य आणि ट्यूनिंग दिसून येईल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कष्टाचा असून मेहनतीमुळे त्यांना अपेक्षित यश नक्कीच गवसेल. उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

मीन: हा आठवडा लाभदायक ठरेल. पुरेशी विश्रांती घ्या. आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित खर्च उद्भवल्याने थोडे बजेट कोलमडू शकते, तरीही परिस्थिती नियंत्रणात राहील. व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत आपली विश्वासार्हता जपली तर मोठा नाववलौकिक मिळेल. नोकरीत अतिआत्मविश्वास नडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नम्र राहून काम करा. प्रेमसंबंधात इतके गुंतून जाल की कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. ज्याचे पडसाद उमटू शकतात. वैवाहिक जीवनात किरकोळ तणाव सोडला तर बाकी सर्व सुरळीत राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन कमी लागेल, त्यामुळे मनाची एकाग्रता साधण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

















