सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:20 IST2026-04-03T15:16:06+5:302026-04-03T15:20:14+5:30
तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातील सब-रजिस्ट्रार कार्यालयात भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे.

सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातील सब-रजिस्ट्रार कार्यालयात भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. तेलंगणा अँटी-करप्शन ब्युरोने (ACB) २ एप्रिल रोजी वारंगल (ग्रामीण) सब-रजिस्ट्रार कार्यालयावर अचानक छापा टाकला. या कारवाईत अवैध व्यवहार, विनानोंदणीची कागदपत्रं आणि अनधिकृत एजंटचा वावर उघड झाला आहे. वारंगल रेंजच्या एसीबी अधिकाऱ्यांनी हनुमकोंडा जिल्ह्यातील या कार्यालयात ही कारवाई केली. या छाप्यानंतर दोन अधिकाऱ्यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली, जिथे कोट्यवधी रुपयांचं सोनं-चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
एसीबीच्या तपासणीदरम्यान कार्यालय परिसरात २० अनधिकृत एजंट आणि क्लार्क काम करताना आढळले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून ४७,४५० रुपये रोख आणि ७० कागदपत्रं जप्त केली आहेत. यामुळे जमीन आणि मालमत्तेच्या व्यवहारांत गंभीर गैरप्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
🚨 “दफ्तर में छुपा खजाना! रेड में खुला भ्रष्टाचार का खेल”
— PRIYA RANA (@priyarana3101) April 3, 2026
तेलंगाना के वारंगल सब-रजिस्ट्रार ऑफिस में रेड, सवा करोड का सोना और 25 लाख कैश बरामद।#Telangana#Warangal#BreakingNews#Raid#Corruption#BlackMoney#Gold#CashRecoverypic.twitter.com/Rzf2fx3RvY
WhatsApp चॅटने वाढवल्या अडचणी
तपास पथकाने क्लार्कचे मोबाईल तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. एसीबीच्या म्हणण्यानुसार, सब-रजिस्ट्रार अधिकारी-I जमालापुरम रामचंद्र राव आणि सब-रजिस्ट्रार अधिकारी-II दावुलुरी आनंद यांच्यातील व्हॉट्सएप चॅट उघड झाले आहेत. या चॅट्समध्ये गेल्या एका वर्षात फोन-पे (PhonePe) द्वारे सुमारे ४२.०३ लाख रुपयांच्या व्यवहारांचा उल्लेख आहे.
अधिकाऱ्यांच्या घरात सोन्या-चांदीचं घबाड
कार्यालयानंतर एसीबीने दोन्ही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी एकाच वेळी झडती सत्र राबवलं. यावेळी २४.६१ लाख रुपये रोख, ८१९.५ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत सुमारे १.२३ कोटी रुपये) आणि २.६ किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच, सब-रजिस्ट्रार दावुलुरी आनंदच्या घरातून 'कपिल चिट्स'मधील ३०.१० लाख रुपयांच्या मुदत ठेवींची (FD) कागदपत्रंही सापडली आहेत. एसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार केला जात असून तो पुढील कारवाईसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाईल.