जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:02 IST2025-08-15T15:43:07+5:302025-08-15T16:02:00+5:30
Shri Krishna Janmashtami 2025 Astrology Lord Krishna Favorite Zodiac Signs: कोणत्या भाग्यवान राशी आहेत, ज्या श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

Shri Krishna Janmashtami 2025 Astrology Lord Krishna Favorite Zodiac Signs: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. यंदा १५ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीकृष्ण जयंती आणि १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला आहे.
श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते.
महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते.
ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात.
महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात. तसेच गोकुळाष्टमी नवरात्र-श्रावण प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे नवरात्र केले जाते.
या नवरात्रात भागवत सप्ताह केला जातो. ते शक्य नसल्यास भागवताच्या एखाद्या स्कंधाचे या पठण श्रवण केले जाते. अथवा अखंड नामसप्ताह, कीर्तनाचे आयोजन केले जाते. अनेक कृष्ण मंदिरात तसेच विठ्ठल मंदिरातही हे नवरात्र उत्साहाने साजरे होते. याची समाप्ती गोपाळकाल्याने होते. भंडारा मात्र बहुतेक ठिकाणी असतो. काही मान्यतांनुसार श्रीकृष्णांच्या अशा काही अतिशय प्रिय राशी आहेत, ज्यांवर श्रीकृष्णांसह लक्ष्मी देवीचा वरदहस्त काय असतो. यश, प्रगती, धन-धान्य, ऐश्वर्य-वैभव भरभरून मिळते, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
वृषभ: या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. ही रास भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. ही राशी रोहिणी नक्षत्रात येते. श्रीकृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला होता. या राशीच्या लोकांना भगवान विष्णू तसेच श्रीकृष्णांचा विशेष आशीर्वाद असतो. राधा राणी आणि श्रीकृष्ण मंत्राचा जप केल्याने कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. मानसिक आणि शारीरिक ताणतणावापासून मुक्ती मिळण्यासोबतच नोकरी आणि व्यवसायात अपार यश मिळते. संपत्ती आणि समृद्धीची कमतरता नसते. या राशीवर विशेष कृपा असते. प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. हे लोक खूप मेहनती आणि प्रामाणिक असतात.
तूळ: या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह सौंदर्य, प्रेम, कला आणि संगीताचे प्रतीक मानला जातो. तूळ राशीच्या लोकांना जीवनात संतुलन राखणे आवडते. त्यांना न्याय आवडतो. या राशीचे लोक धार्मिक आणि भावनिक असतात. हेच कारण आहे की, भगवान श्रीकृष्ण या राशीवर खूप प्रेम करतात. त्यांची कृपा या लोकांवर नेहमीच राहते. बाळकृष्णांच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना जीवनात खूप आदर मिळतो आणि सुख-समृद्धी नेहमीच राहते. इच्छा पूर्ण होऊ शकतात.
वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रह धैर्य, ऊर्जा, शौर्य आणि युद्धाचे प्रतीक मानला जातो. वृश्चिक राशीचे लोक खूप धाडसी असतात. त्यांना धर्माचे रक्षण करायला आवडते. तसेच, मान्यतेनुसार, ही राधा राणीची रास आहे, म्हणूनच वृश्चिक भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. श्रीकृष्ण कृपेने या लोकांना जीवनात आनंद आणि यश मिळते. संघर्षांशी लढण्याची शक्ती मिळते. कामातील अडथळे दूर होऊ लागतात. खूप शुभ परिणाम मिळतात.
धनु: धनु राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांवर श्रीकृष्णांचा विशेष आशीर्वाद असतो. काही मान्यतांनुसार, मीन राशीचे आराध्य श्रीविष्णू मानले जातात. या राशीचे लोक धर्म, सत्य आणि न्यायाशी संबंधित असतात. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांवर बाळकृष्णाची विशेष कृपा लाभते, ज्यामुळे त्यांना खूप आदर आणि भौतिक सुख मिळते. या राशीच्या लोकांचा प्रेरणा, उत्साह आणि सत्य यावर भर असतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण धनु राशीवर प्रेम करतात. श्रीकृष्ण कृपेमुळे या लोकांचे ज्ञान वाढते. त्यांना जीवनातील दुःखांपासूनही मुक्ती मिळते. धन, संपत्ती आणि सौभाग्य मिळू शकते. जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात. आदर वाढतो.
मीन: मीन राशीचा स्वामी गुरु आहे. काही मान्यतांनुसार, मीन राशीचे आराध्य श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवींना मानले गेले आहे. श्रीकृष्ण हे श्री हरी विष्णूचेच अवतार आहेत, म्हणून या राशीच्या लोकांवर बाळकृष्णाची विशेष कृपा असते. या लोकांना सर्व प्रकारचे सुख मिळते. कान्हा कृपेने समाजात आदर, सन्मान वाढतो. अध्यात्माकडे अधिक कल असतो. वैवाहिक जीवनही चांगले जाऊ शकते. कठोर परिश्रमाच्या बळावर भरपूर यश मिळते. या राशीचे लोक भावनिक, संवेदनशील आणि प्रेमळ असतात. या स्वभावामुळे भगवान श्रीकृष्ण या राशीवर प्रेम करतात. त्यांचे आशीर्वाद या राशीच्या लोकांवर सदैव राहतात. श्रीकृष्णाच्या कृपेने जीवनात सर्व प्रकारचे आनंद मिळतात. जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.