राहु-केतु गोचर: ५ राशींची दिवाळी, सुख-समृद्धी काळ; अचानक धनप्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 01:05 PM2023-10-27T13:05:13+5:302023-10-27T13:12:08+5:30

राहु आणि केतुचे गोचर अतिशय महत्त्वाचे मानले गेले असून, लाभ मिळणाऱ्या भाग्यवान राशी कोणत्या, ते जाणून घ्या...

सन २०२३ मध्ये सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे राशीपरिवर्तन ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस होत आहे. क्रूर, छायाग्रह मानले गेलेले राहु आणि केतु गोचर करणार आहेत. राहु आणि केतू अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत विराजमान आहेत. हे दोन्ही ग्रह आता वक्री चलनाने राशीपरिवर्तन करणार आहे. अन्य कोणत्याही ग्रहांपेक्षा राहु आणि केतुचे राशीपरिवर्तन आत्यंतिक महत्त्वाचे मानले जाते.

दिवाळीच्या १२ दिवस आधी राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. राहु आणि केतु यांचे गोचर देश-दुनियेवर प्रभाव करणारे मानले जात आहे. आताच्या घडीला मेष राशीत गुरु आणि राहु यांचा गुरु चांडाल योग जुळून आला आहे. हा एक प्रतिकूल योग मानला जातो. राहु गोचरनंतर हा योग समाप्त होईल.

त्याचप्रमाणे तूळ राशीत मंगळ आणि केतु यांचा अशुभ योग तयार झाला आहे. केतु कन्या राशीत गेल्यानंतर या प्रतिकूल योगाची सांगता होईल. राहु आणि केतु या ग्रहांच्या गोचराचा ५ राशीच्या व्यक्तींना दिवाळीपूर्वीच भरपूर लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. लक्ष्मी देवीची कृपाही होऊ शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना राहु-केतु गोचर शानदार ठरू शकेल. सर्व प्रलंबित कामे एकामागून एक पूर्ण होतील. करिअर आणि व्यवसायात शुभ परिणाम दिसतील. आरोग्य चांगले राहील. आर्थिक बाबतीतही फायदा होईल. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. वाहन सुख मिळण्याची आशा आहे. कार्यालयात पद आणि प्रतिष्ठा वाढेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना राहु-केतु गोचर खूप शुभ प्रभाव असल्याचे मानले जाते. आतापर्यंत मार्गात जे अडथळे येत होते ते दूर होतील. अचानक पैसे मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत फायदा होईल. करिअरच्या बाबतीत नशीब अनुकूल होईल. खूप पूर्वी एखाद्याला दिलेले कर्ज यावेळी परत मिळू शकते.

मिथुन राशीच्या व्यक्तींना राहु-केतु गोचर सकारात्मक ठरू शकेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. ऑफिसमध्ये कामाचे वातावरण चांगले मिळेल. करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. ऑफिसमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील.

कर्क राशीच्या व्यक्तींना राहु-केतु गोचर शुभ सिद्ध होणार आहे. आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. धैर्य आणि शौर्य वाढेल. मेहनतीचे फळ व्यवसायात यशाच्या रूपाने मिळेल. काही अडकलेले पेमेंट मिळू शकते. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना राहु-केतु गोचर प्रगतीकारक ठरू शकेल. जीवनात यश मिळू शकेल. अचानक काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये भरपूर लाभ मिळतील. व्यवसायात चांगला परतावा मिळेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल.

राहु आणि केतु एका राशीत सुमारे १८ महिने विराजमान असतात. विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून कायम समसप्तक स्थानी असतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.