लातूरची 'लेक' टॉपर! देशात दुसरी अन् राज्यात पहिली; प्रतीक्षा काळेचा प्रेरणादायी प्रवास

By ओमकार संकपाळ | Published: May 21, 2024 05:39 PM2024-05-21T17:39:23+5:302024-05-21T17:50:52+5:30

Pratiksha Kale Story : प्रतीक्षा काळे यांनी यशाला गवसणी घालून अनेकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

मेहनत आणि कष्ट प्रामाणिक असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे नेहमी बोलले जाते. जिद्दीच्या जोरावर असामान्य कामगिरी करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवणारे अनेक उदाहरणे आहेत. यातीलच एक नाव म्हणजे प्रतिक्षा नानासाहेब काळे.

प्रतीक्षा यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात, तर पुणे येथील सीओईपीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या वनसेवा परीक्षेतही प्रतीक्षा राज्यात पहिली आली होती.

सुरुवातीला त्यांनी यूपीएससी सीएसईच्या मोहात अडकून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. मग त्यांनी आपल्या स्वप्नांना नवीन दिशा देताना भारतीय वन सेवेत (IFS) अधिकारी होण्याचे ठरवले. UPSC परीक्षेतील सहा प्रयत्नांसह भयंकर अडथळ्यांचा सामना करूनही त्यांनी जिद्द न हारता अखेर यशाला गवसणी घातली.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या भारतीय वनसेवा परीक्षा २०२३ (IFS) परिक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाले. अलीकडेच २०२३ मध्ये झालेल्या परिक्षेचा निकाल लागला. प्रतिक्षा यांनी भारतात दुसरा क्रमांक पटकावून वन अधिकारी होण्याचेही स्वप्न पूर्ण केले.

प्रतीक्षा काळे यांनी आपल्या या प्रवासाचे वर्णन दोन टप्प्यात केले. २०१९ पर्यंतचा कालावधी आणि त्यानंतरचा एक टप्पा. त्यांनी यूपीएससीत एकूण सहा प्रयत्न केले. यातील पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांनी प्रामुख्याने नागरी सेवा परीक्षेवर (CSE) लक्ष केंद्रित केले. मात्र, चौथ्या प्रयत्नापासून त्यांनी भारतीय वन सेवा (IFS) परीक्षेवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

प्रतीक्षा काळे यांनी २०१५ मध्ये UPSC CSE मध्ये पहिला प्रयत्न केला पण प्रिलिम्स देखील पूर्ण करता आली नाही. त्यानंतर त्यांनी २०१६, २०१७ आणि २०१८ मध्ये UPSC CSE साठी जोर लावला. परंतु, दोनदा प्रिलिम्स क्लिअर करण्यात त्यांना अपयश आले आणि एकदाच मुख्य परिक्षेपर्यंत मजल मारता आली. पण यात त्यांना फक्त ४ गुणांनी यशाने हुलकावणी दिली.

या चार प्रयत्नांनंतर प्रतीक्षा यांनी IFS वरही लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. २०१९ मध्ये त्यांच्या पाचव्या प्रयत्नात त्यांनी CSE आणि IFS या दोन्ही परीक्षा दिल्या. हा त्यांच्या UPSC च्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक प्रयत्न होता. कारण यावेळी त्यांनी IFS प्रिलिम्स पास केली पण मुख्य परीक्षेच्या एक आठवडा आधी त्यांना डेंग्यूच्या आजाराने घेरले.

प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला पण त्यांनी या आजारावरही मात करत मुलाखत फेरी गाठली. पण, खूप प्रयत्न करूनही त्यांना अंतिम यादीत स्थान मिळू शकले नाही.

प्रतीक्षा काळे सांगतात की, मी डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे मुलाखतीचा कॉल प्राप्त करणे हे मोठे आव्हान आहे. म्हणूनच मी तुलनेवर विश्वास ठेवत नाही. इतरांशी तुलना केलेली मला पटत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या असतात. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे आपले यश आणि अपयश काय आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. त्या एका इंग्लिश वृत्तसंस्थेशी बोलत होत्या.

दरम्यान, प्रतीक्षा यांनी UPSC च्या त्यांच्या पाचव्या प्रयत्नादरम्यान एका मैत्रिणीने दिलेला सल्ला ऐकला. त्यांना राज्य वन सेवेची परीक्षा देण्याचा सल्ला देण्यात आला. मग त्यांनी पहिल्याच प्रयत्नात २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य वन परीक्षा (MPSC फॉरेस्ट सर्व्हिस) यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी कोईम्बतूर येथील ‘सेंट्रल अकादमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस’मध्ये दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतले.

यानंतरच्या काळात त्यांनी तीन वर्षे ब्रेक घेतला. मग शेवटी त्यांनी प्रशिक्षणानंतर जोरदार पुनरागमन केले आणि IFS-2023 क्रॅक करून त्यांच्या सहाव्या प्रयत्नात भारतात दुसरा क्रमांक पटकावला. IFS अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.

प्रतीक्षा काळे या मूळच्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील विद्यार्थ्यांचे क्लास घेतात, तर आई हाउसवाइफ आहे. त्यांची बहीण पेशाने इंजिनिअर आहे. त्यांनी १२वी पर्यंतचे शिक्षण आपल्या गावी लातूर येथे पूर्ण केले. त्यानंतर २०१४ मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे (बी. टेक) शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षांची तयारी सुरू केली.