४ महिने शुभ होईल! मंगळ अस्त ५ राशींचे मंगल करेल, हानी योगाचा फायदाच फायदा; ८५ दिवस अपार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:37 PM2023-09-28T13:37:15+5:302023-09-28T13:50:05+5:30

अस्तंगत मंगळाचा प्रभाव कहीं खुशी, कहीं गम, असा पडू शकेल. तुमच्यासाठी आगामी काळ कसा असेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह आताच्या घडीला कन्या राशीत विराजमान आहे. कन्या राशीत मंगळ अस्तंगत आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे, एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते.

कन्या राशीत मंगळ ग्रहासोबत सूर्य ग्रह आहे. त्यामुळे कन्या राशीत मंगळाचा अस्त झाला आहे. १७ जानेवारी २०२४ पर्यंत मंगळ अस्तंगत स्थितीत भ्रमण करणार आहे. ०३ ऑक्टोबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर काही दिवसांनी सूर्य ग्रहही कन्या राशीतून तूळ राशीत गोचर करणार आहे.

तूळ राशीत प्रवेश केल्यानंतर मंगळ आणि राहु यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. तसेच केतुशी युती योग तयार होत आहे. आताच्या घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत आहेत. त्यामुळे राहु आणि मंगळ हे एकमेकांपासून सातव्या स्थानी असतील. मंगळ ग्रहाचे अस्तंगत होणे काही राशींसाठी मंगलमय तर काही राशींसाठी प्रतिकूल ठरू शकते. मंगळ कुणाचे मंगल करणार? कुणाला संमिश्र काळ ठरू शकतो? जाणून घेऊया...

मेष: मंगळ अस्ताचा प्रभाव सामान्य राहील. आरोग्य चांगले राहू शकेल. वाद मिटू शकतील. परदेश प्रवासाचा लाभ मिळेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली निघू शकतील. कोणत्याही प्रकारचे मोठे कर्ज घ्यायचे असेल तर त्या दृष्टिकोनातून ही एक चांगली संधी असेल.

वृषभ: मंगळाचा नकारात्मक प्रभाव संपेल. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी चांगली बातमी मिळू शकेल. प्रेमसंबंधातील दुरावा संपेल. वैवाहिक जीवनातही गोडवा राहील. रोजगाराच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न तुलनेने चांगले असतील. कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल, तर त्या दृष्टिकोनातूनही आगामी काळ चांगला ठरू शकतो.

मिथुन: मंगळाच्या प्रभावामुळे कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्वस्थता यापासून दिलासा मिळू शकेल. मात्र, मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातम्या मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. आनंद मिळेल. काळजीपूर्वक प्रवास करा. महत्त्वाच्या गोष्टी सांभाळा.

कर्क: अस्तंगत मंगळ संमिश्र परिणाम देईल. कौटुंबिक वाद, विशेषत: लहान भावांसोबतचे मतभेद कमी होतील, तरीही धर्म आणि अध्यात्मात रस राहील. साहस आणि शौर्याच्या बळावर कठीण प्रसंगांवर नियंत्रण ठेवू शकाल. शुभ प्रभावामुळे सकारात्मकता येऊ शकेल. काळजी करण्याचे कारण नाही.

सिंह: मंगळाच्या प्रभावामुळे कुटुंबात सुरू असलेला कलह संपुष्टात येईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ऊर्जेचा पुरेपूर वापर करून काम केल्यास योजना पूर्ण होतील. मात्र, त्या सार्वजनिक न केल्यास अधिक यशस्वी व्हाल. वादग्रस्त प्रकरणे चर्चेतून सोडवणे हिताचे ठरू शकेल.

कन्या: रागावर नियंत्रण ठेवून काम केल्यास अधिक यश मिळेल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये प्रलंबित असलेली कामे पूर्ण केली जातील. कोणत्याही सरकारी निविदेसाठी अर्ज करणे चांगले होईल. वैवाहिक जीवन सुधारेल. विवाहसंबंधित चर्चा यशस्वी होईल. भागीदारीत किंवा संयुक्त व्यवसाय करणे टाळा.

तूळ: अस्तंगत मंगळाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकेल. विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर काळ अनुकूल राहतील. अनावश्यक भांडणे आणि वाद टाळा. अवाजवी खर्चामुळे आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागू शकते. कोणतेही मोठे काम करायचे असल्यास किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करावयाची असल्यास अटी आणि शर्ती गांभीर्याने तपासल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करा.

वृश्चिक: अस्तंगत मंगळाच्या प्रभावामुळे जास्त नुकसान होणार नाही आणि फायदाही होणार नाही. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी आनंददायी काळ असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. प्रेमसंबंधित बाबींमध्ये उदासीनता राहील, त्यामुळे कामात लक्ष दिल्यास बरे होईल. संशोधन आणि कल्पक कामात यश मिळेल.

धनु: अस्तंगत मंगळाचा प्रभाव संमिश्र दिसू शकेल. नोकरी आणि व्यवसायातील कामात काहीशी शिथिलता जाणवू शकेल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमधील कामे होण्याची शक्यता आहे. सर्जनशील कार्यात यश मिळेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली निघतील. वाहन खरेदी करायचे असेल तर त्या दृष्टीने ग्रहस्थिती अनुकूल आहेत.

मकर: अस्तंगत मंगळाचा प्रभाव संमिश्र दिसू शकेल. नोकरी आणि व्यवसायातीला कामात शिथिलता जाणवत असली तरी यश-प्रगतीचे मार्ग खुले होतील. आध्यात्मिक शक्ती विकसित होईल. साहस आणि शौर्याच्या जोरावर कठीण प्रसंगांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील. योजना गोपनीय ठेवा आणि पुढे जा.

कुंभ: मंगळाच्या प्रभावामुळे काही मानसिक त्रासातून दिलासा मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. या काळात भावनेच्या भरात निर्णय घेतल्यास नुकसान होईल. वादग्रस्त प्रकरणे चर्चेतून सोडवण्यावर भर द्यावा. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. प्रतिकूल परिस्थिती असली तरी काही मोठे सन्मान किंवा पुरस्कार जाहीर केले जाऊ शकतात.

मीन: अस्त मंगळाच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनातील कटुता संपेल. चर्चा यशस्वी होईल. सासरच्यांशी संबंध सामान्य राहतील. व्यवसायाचे वातावरण आनंददायी राहील. भागीदारीत किंवा संयुक्त व्यवसाय करणे टाळावे. परदेश प्रवासाचा लाभ मिळेल. नवीन लोकांशी सुसंवाद वाढेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी संबंधही घट्ट होतील. सरकारी सेवेसाठी अर्ज करता येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.