अधिक मास: नक्षत्र गोचराने शनी-राहु अशुभ योग, ५ राशींना संमिश्र काळ; ४ महिन्यांनी अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 03:17 PM2023-07-22T15:17:00+5:302023-07-22T15:23:01+5:30

Adhik Maas 2023: शततारका नक्षत्रातील शनी-राहु प्रतिकूल योगात काही राशींनी सतर्क राहावे. ऑक्टोबरनंतर गुंतवणुकीतून फायदा, यश-प्रगती, धनलाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

१८ जुलै रोजी सुरू झालेला अधिक महिना १६ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सन २०२३ मध्ये चातुर्मासात श्रावण महिना अधिक मास आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, अधिक महिन्यात काही शुभ योग तर काही प्रतिकूल योग जुळून येत आहेत. अधिक मासात लक्ष्मी नारायण नामक अत्यंत अद्भूत शुभ राजयोग जुळून येत आहे.

मात्र, त्यासोबत खप्पर नामक प्रतिकूल योगही जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह नियमित कालावधीत राशी व नक्षत्र बदलत असतात. आपल्याकडे नक्षत्र आणि त्यातील ग्रहांच्या स्थितीला अतिशय महत्त्व आहे. अधिक मासात शनी आणि राहु यांचा एक प्रतिकूल योग जुळून येत आहे.

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी शततारका नक्षत्र गोचर करत आहे. शततारका नक्षत्राचा स्वामी राहु आहे. या नक्षत्रात शनी १७ ऑक्टोबरपर्यंत विराजमान असणार आहे. शनीचे राहुचे स्वामित्व असलेल्या शततारका नक्षत्रातील गोचर महत्त्वाचे मानले गेले आहे. शनी आताच्या घडीला स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान असून वक्री आहे.

शनीच्या शततारका गोचरामुळे ज्योतिषशास्त्रात छाया, क्रूर ग्रह मानल्या गेलेल्या राहुशी प्रतिकूल योग जुळून येत आहे. आताच्या घडीला राहु मेष राशीत वक्री चलनाने विराजमान आहे. शनी-राहु यांच्या प्रतिकूल योगाचा प्रभाव काही राशींवर पडू शकतो. या राशींना आगामी काळ संयमाने, सतर्कपणे आणि सावधान राहून कार्य करावी लागणार आहेत. कालांतराने अच्छे दिन येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

कर्क राशीच्या व्यक्तींना शततारका नक्षत्रात शनी राहुचा योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो, त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. आगामी काळात कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करणे टाळावे. ऑक्टोबरनंतर तुमचे चांगले दिवस येणार आहेत. आर्थिक लाभासोबतच प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.

कन्या राशीच्या व्यक्तींना शततारका नक्षत्रात शनी राहुचा योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. सारासार विचार न करता कोणताही निर्णय घेणे टाळा. कष्ट करूनही यश मिळणार नाही. शक्य तितकी काळजी घ्या. ऑक्टोबरनंतर आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. गुंतवणुकीत तुम्हाला नफा मिळू लागेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शततारका नक्षत्रात शनी राहुचा योग संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तुमचे मतभेद होऊ शकतात. चुकीच्या पद्धतीने कमावलेले पैसे परत करावे लागतील. प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी चांगली. कोणतेही वाहन चालवताना काळजी घ्या. ऑक्टोबरनंतर राहु आणि शनीचा प्रभाव कमी होईल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आर्थिक स्थिती चांगली होईल. लव्ह लाइफही सुधारू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना शततारका नक्षत्रात शनी राहुचा योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. अहंकाराची भावनेमुळे त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. कौटुंबिक शांतता बिघडू शकते. ऑक्टोबरनंतर परिस्थिती बदलेल. वैयक्तिक आयुष्यातही सुधारणा दिसून येईल. जोडीदारासोबत समन्वय पूर्वीपेक्षा चांगला राहील. कुटुंबात सुख-शांतता नांदेल.

मीन राशीच्या व्यक्तींना शततारका नक्षत्रात शनी राहुचा योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते. बजेट बिघडू शकते. ऑक्टोबरनंतर या सर्व परिस्थिती बदलतील. तब्येत चांगली राहू शकेल. अडकलेले किंवा थांबलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.