चार्जिंगमध्ये १२० किमी धावेल, वाटेत बॅटरी संपली तरी झंझट नाही; किंमत तर फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:01 PM2023-02-28T12:01:16+5:302023-02-28T12:04:00+5:30

गेल्या काही काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणि विक्री दोन्ही वेगाने वाढत आहे. विशेषत: दुचाकी वाहनांची लोकांमध्ये अधिक क्रेझ पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर्सची मागणी वाढली आहे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक सायकली देखील वापरल्या जात आहेत.

बाजारात अनेक इलेक्ट्रिक सायकली (E-Cycle) उपलब्ध आहेत, परंतु आज आम्ही तुमच्यासाठी उत्तम ड्रायव्हिंग रेंज असलेली इलेक्ट्रिक सायकल घेऊन आलो आहोत. Motovolt ने अलीकडेच आपली अर्बन ई-बाईक बाजारात आणली आहे.

आकर्षक लूक आणि अधिक क्षमता असलेल्या बॅटरी पॅकने सजलेली ही ई-सायकल पॅडल मोडमध्येही चालवता येते. Motovolt Urban मध्ये, कंपनीने 36 V/20 Ah क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो एका चार्जमध्ये १२० किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो.

तिचा टॉप स्पीड २५ किमी प्रतितास आहे आणि ही ई-बाईक फक्त १० सेकंदात ० ते २५ किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम आहे. यामध्ये पॅडल असिस्ट फीचर देखील देण्यात आले आहे. कंपनीने टॉप स्पीड कमाल २५ किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवला आहे.

कंपनीचा दावा आहे की ही ई-बाईक सर्व प्रकारच्या रस्त्यांच्या स्थितीवर चांगली कामगिरी करते. यात पुढील बाजूस स्प्रिंग ऑपरेटेड सस्पेन्शन आणि मागील बाजूस हायड्रॉलिक कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन आहे, ज्यामुळे राइड आरामदायी होते.

दोन्ही चाकांवर असलेले डिस्क ब्रेक ब्रेकिंग संतुलन साधण्यात मदत करतात. ही इलेक्ट्रिक मोपेडसारखे दिसते, परंतु कंपनीने तिला सायकलच्या श्रेणीमध्ये ठेवले आहे. Motovolt Urban मध्ये कंपनीने LCD कन्सोल दिला आहे, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह येतो.

या E-Bike चे वजन फक्त ४० kg आहे, जे तिची ड्रायव्हिंग रेंज उत्तम ठेवण्यास मदत करते. ही ई-बाईक चार रंगांमध्ये उपलब्ध आहे ज्यात एकूण दोन प्रकार आहेत, ज्यात लाल, आकाशी निळा, पांढरा आणि पिवळा रंगांचा समावेश आहे.

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही ही ई-बाईक फक्त ९९९ रुपयांमध्ये बुक करू शकता. यात अर्बन एसटीडी या व्हेरिएंटची किंमत ४९ हजार ९९९ इतकी आहे तर अर्बन स्मार्ट प्लस याची किंमत ५४ हजार ९९९ इतकी आहे.

ग्राहक Motovolt च्या वेबसाइटवरून आणि ईएमआय पर्यायांसह १००+ स्टोअरमधून ई-बाईक खरेदी करू शकतात. अर्बनमध्ये 16Ah आणि 20Ah काढता येण्याजोग्या बॅटरी आहेत ज्या 36V आहेत. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे चार तास लागतात.

अर्बनला हँडल लॉक आणि इतर वैशिष्ट्यांसह स्टार्ट बटण मिळते. अर्बन ई-बाईक नोंदणी आणि परवान्याशिवाय चालवता येते. या ई सायकल मुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी पर्यायात चांगला पर्याय मिळाला आहे.