PMV electric: 16 नोव्हेंबरला लॉन्च होणार 'छोटू' Electric Car, 4 तासात फूल चार्ज अन् 200KM धावणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 04:56 PM2022-11-03T16:56:01+5:302022-11-03T17:00:07+5:30

PMV electric car launch: मुंबईमधील इलेक्ट्रिक वाहन कंपनी लवकरच पहिली मायक्रो इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहे.

PMV EaS-E micro electric car: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे, यामुळे अनेक नवनवीन कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत. मुंबईस्थित इलेक्ट्रिक वाहन कंपनी PMV इलेक्ट्रिक लवकरच पहिली मायक्रो इलेक्ट्रिक कार(EaS-E) लॉन्च करणार आहे. येत्या 16 नोव्हेंबर 2022 रोजी PMV चे भारतातील पहिले वाहन बाजारात येईल.

PMV या इलेक्ट्रिक वाहनाद्वारे भारतीय बाजारपेठेत पर्सनल मोबिलिटी व्हेईकल (PMV) नावाचा एक नवीन विभाग तयार करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या वाहनाचे बुकिंग आधीच सुरू केले आहे.

असा दावा केला जात आहे की, कंपनीने केवळ भारतातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातूनही मोठी प्री-ऑर्डर बुक तयार केली आहे. पूर्ण चार्ज मध्ये 200KM धावेल- PMV EAS-E मायक्रो इलेक्ट्रिक कारमध्ये 10 kW लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी देण्यात आली आहे.

ही बॅटरी 15 kW (20 bhp) PMSM इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे. या वाहनाचा टॉर्क अद्याप समोर आलेला नसला तरी टॉप स्पीड 70 किमी प्रतितास असेल.

फक्त 4 तासात चार्ज होणार-रिपोर्टनुसार, ही मायक्रो इलेक्ट्रिक कार तीन प्रकारात आणली जाईल, ज्यामध्ये 120 कि.मी. पासून 200 किमी पर्यंतची रेंज असेल.

कंपनीचा दावा आहे की नवीन मायक्रो इलेक्ट्रिक कार तिच्या 3 किलोवॅट एसी चार्जरने केवळ 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. या इलेक्ट्रिक कारची लांबी 2,915 मिमी, रुंदी 1,157 मिमी आणि उंची 1,600 मिमी आहे.

तसेच, त्याचा व्हीलबेस 2,087 मिमी असेल आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 मिमी असेल. इलेक्ट्रिक कारचे कर्ब वजन सुमारे 550 किलो आहे.

या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, PMV EAS-E मध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एअर कंडिशनिंग, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.