CNG Car Maruti Suzuki : ‘या’ CNG कारवर तुटून पडले ग्राहक, वेटिंग पीरिअड ९ महिन्यांवर; ७ सीटर आहे ही कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 10:47 AM2022-11-01T10:47:24+5:302022-11-01T10:58:18+5:30

मारुती सुझुकीच्या एका कारवर ग्राहक इतके तुटून पडलेत की या कारचं वेटिंग आता तब्बल ९ महिन्यांवर आलं आहे.

मारुती सुझुकीच्या एका कारवर ग्राहक इतके तुटून पडलेत की या कारचं वेटिंग आता तब्बल ९ महिन्यांवर आलं आहे. ही कार आहे ती म्हणजे मारूती सुझुकीची अर्टीगा सीएनजी. या कारच्या ZXI व्हेरिअंटची किंमत 11.60 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे.

बाजारात या कारची मागणी इतकी वाढली आहे की या कारचं वेटिंग पीरिअडही अतिशय जास्त आहे. कंपनीनं नुकतीच आपली बलेनो आणि एक्सएल 6 चं सीएनजी व्हर्जन लाँच केलं होतं. यानंतर कंपनीच्या सीएनजी कार्सच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ झाली आहे. कंपनी आपल्या सीएनजी कार्सची संख्याही आता वाढवत आहे.

अपडेटेड अर्टिगा एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आली होती. यानंतर त्यात एस सीएनजी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. याच्या सीएनजी व्हेरिअंटची मागणी इतकी वाढली की आता याचे वेटिंग पीरिअड 9 महिन्यांवर पोहोचला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे कंपनीला मागणी पूर्ण करण्यास विलंब होत आहे.

सीएनजी कारसाठी सुमारे 1.23 लाख युनिट्सचे बुकिंग प्रतीक्षेत आहे. गेल्या वर्षी सीएनजी वाहनांसाठी दैनंदिन बुकिंग 1,300 ते 1,400 दरम्यान होते. त्याच वेळी, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, ही संख्या सुमारे 1,500 पर्यंत वाढली होती. सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ते पुन्हा 1,300 ते 1,400 च्या दरम्यान घसरले आणि तेव्हापासून ते कायम असल्याची माहिती मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी संचालक, विपणन आणि विक्री शशांक श्रीवास्तव यांनी दिली.

परंतु सीएनजीच्या वाढत्या किंमतींमुळे त्याचे दर आता पेट्रोलच्या जवळ पोहोचत आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी तो एक चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याच्या सीएनजीच्या किंमती या तात्पुरत्या आहेत. परंतु आता पहिल्यापेक्षा लोक अधिक जागरुक झाले आहेत, असं श्रीवास्तव म्हणाले.

मारुती सुझुकीनं पहिल्यांदा 2010 मध्ये आपल्या मॉडेलमध्ये सीएनजी तंत्रज्ञान वापरलं होतं. त्यावेळी कंपनीनं वॅगन आर आणि ईकोमध्ये सीएनजी लाँच केलं होतं. कंपनीनं नंतर डिझेल कार्सचं उत्पादन पूर्णपणे बंद केलं. आता कंपनी केवळ सीएनजी आणि पेट्रोल कार्सवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे.