ऐतिहासिक बाग बनतेय ‘हिमायत बार’; ३०३ बॅाटल आणि १५० किलो प्लास्टिक रॅपर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 06:53 PM2021-08-09T18:53:50+5:302021-08-09T19:08:49+5:30

( - साहेबराव हिवराळे ) औरंगाबाद : हिमायत बाग ( Himayat Garder ) हा शहराचा ऐतिहासिक वारसा व विद्यमान काळातील ऑक्सिजन हबच ( Oxygen Hub). विविध प्रकारच्या फळफुलांसह, मोर आणि विविध पक्ष्यांची वसाहत, शहरवासीयांच्या पर्यटनस्थळात येऊन काही दारुड्यांनी चोरीछिपे दारू ढोसणे सुरू केले आहे.

औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुपने रविवारी बागेत राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत दारूच्या फेकलेल्या रिकाम्या ३०३ बॉटल आणि १५० किलो कचरा जमा झाल्याने बागेच्या अस्तित्वाला नवाच धोका निर्माण झाला आहे.

हिमायत बागेत सकाळी व सायंकाळी वयोवृद्ध तसेच महिला, नागरिक व युवकांची फिरण्यासाठी गर्दी असते. शनिवार व रविवारी अनेक कुटुंबे येथे येऊन निसर्ग अनुभवतात. नर्सरीतील झाड, फळझाडाची ओळख करून घेतात. या आनंदफेरीत बाधा आणली जात असल्याचे दिसते आहे.

बागेत येणाऱ्या पर्यटकांना त्रास दिला जातो आहे. झाडाझुडपाआड तसेच उद्यानातील कॅमेऱ्याची नजर चुकवून ‘ओल्या पार्ट्याचा बार’ उडविणारे अलीकडे वाढले आहेत. कर्मचाऱ्यांना संशय आल्यास ते पोलिसात तक्रार करून या लोकांचा बंदोबस्त करतात. परंतु त्यांनाही धमकाविले जाते आहे.

श्रावणाच्या पार्श्वभूमीवर (गटारी अमावास्या) रविवारी सकाळी गटारीच्या दिवशीच युवकांनी ही स्वच्छता मोहीम राबविली आणि दारूच्या बाॅटल व कचरा पाहून तोंडात बोट घातले.

बागेतील लॉन व झाडाझुडुपाखाली विविध ब्रॅण्डच्या दारूच्या ३०३ रिकाम्या बॉटल आणि १२ गोण्या भरतील एवढा तब्बल १५० किलो प्लास्टीक कचरा जमा झाला. तो मनपाच्या कचरा वेचक कंपनीत जमा करण्यात आला.

ज्येष्ठ तसेच महिला, नागरिक, युवकांचे बागेत येणे-जाणे असते. परंतु वातावरण खराब करणाऱ्या त्रासदायक लोकांना कर्मचारी हाकलून देतात. अनेकदा भांडणे होण्याची भीती असल्याने पोलिसांना बोलवावे लागते. पोलीस गस्त असावी, यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू आहे. - रवी नयनवाड (दक्षता अधीक्षक, हिमायत बाग)

जॉगिंग अथवा ट्रेकिंगला जातांना श्रमदान करा... विविध क्षेत्रात कॉर्पोरेट सेक्टर काम करणारे तसेच कॉलेज तरुणांचा औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुप आहे. ते स्वच्छता अभियान राबवितात. जॉगिंग अथवा ट्रेकिंगला जातांना एक पिशवी जवळ ठेवतात. प्लास्टिक मुक्तीसाठी रस्त्यातील प्लास्टिक उचलून पिशवीत टाकतात. स्वच्छ व सुंदर शहर ही कल्पना अशाच पद्धतीने राबविली जाऊ शकते, असे या ग्रुपच्या युवकांनी सांगितले.

या ग्रुपचे निखील खंडेलवाल, मयंक खंडेलवाल, आदित्य नलावडे, मंगेश बनसोड, सिद्धी संचेती, युतीका भुतडा, गणेश शिंदे, ओंकार भरोटे अथर्व जोशरिया, देवेन वाईकर, प्रथम पाटणी आदी ५० हून अधिक तरुणांनी श्रमदान करून ही मोहीम राबविली.