-रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (जि. परभणी): स्वच्छतेच्या एका छोट्या चुकीमुळे सेलू पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक बोरसे यांना आपली खुर्ची गमावावी लागली आहे. गुरुवारी सायंकाळी नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सेलू पोलीस ठाण्याला दिलेल्या भेटीदरम्यान, आवारात अस्वच्छता दिसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आणि बोरसे यांना तातडीने नियंत्रण कक्षात हजर होण्याचे तोंडी आदेश दिले.
नेमकी घटना काय?
पोलीस अधीक्षक कुमावत सायंकाळी ६:१५ च्या सुमारास सेलू स्टेशनवर पोहोचले. त्यांनी इमारतीची पाहणी केली असता, आवारात बसवलेल्या गट्टूंवर (Paving Blocks) थुंकीची घाण दिसून आली. "तुम्ही येथे कधीपासून आहात?" असा प्रश्न अधीक्षकांनी विचारला. त्यावर "दोन वर्षांपासून" असे उत्तर मिळताच, अस्वच्छतेच्या कारणावरून संतापलेल्या अधीक्षकांनी बोरसे यांना पदमुक्त होण्याचे आदेश दिले. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांच्याकडे पदभार सोपवून तात्काळ परभणी नियंत्रण कक्षात रवाना होण्यास सांगितले.
उत्कृष्ट कामगिरी, पण शेवट दुर्दैवी!
पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी ८ मार्च २०२४ पासून सेलूचा कार्यभार सांभाळताना अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणले होते. त्यांच्या काळात खून, घरफोडी आणि अवैध वाळू वाहतुकीवर मोठ्या कारवाया झाल्या होत्या. विशेष म्हणजे, गेल्या ६ वर्षांत सेलूमध्ये ८ निरीक्षक बदलले, त्यापैकी बोरसे हे सर्वाधिक काळ (२ वर्षे ३ महिने) टिकणारे एकमेव अधिकारी ठरले होते.
शहरात चर्चा : गोवंश कत्तल आणि खून प्रकरण आंगलट?
बोरसे यांची बदली केवळ अस्वच्छतेमुळे झाली की त्यामागे इतर काही कारणे आहेत, यावर शहरात चर्चांना उधाण आले आहे. मागील दोन महिन्यांत त्यांनी गोवंश कत्तल आणि गायत्रीनगर खून प्रकरणात केलेल्या कठोर कारवायाच त्यांच्या अंगलट आल्या का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
एसपी यांच्या आदेशावरून नियंत्रण कक्षात रुजू झालो आहे.
-दिपक बोरसे, पोलिस निरीक्षक.
Web Summary : Selu's police inspector was transferred to the control room after the Superintendent of Police found the station premises unclean during a surprise visit. While he had a good record, the SP took immediate action.
Web Summary : पुलिस अधीक्षक द्वारा अचानक निरीक्षण के दौरान स्टेशन परिसर गंदा पाए जाने पर सेलू के पुलिस निरीक्षक का नियंत्रण कक्ष में तबादला कर दिया गया। उनका रिकॉर्ड अच्छा था, लेकिन एसपी ने तत्काल कार्रवाई की।