सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवून गुजरात टायटन्स या हंगामाच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने हैदराबादला ८२ धावांनी पराभूत केले.
गुजरात टायटन्सचा हा विजय धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. गुजरातने १२ पैकी ८ सामने जिंकून हे यश मिळवले. संघाच्या या यशात त्यांचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आशिष नेहरा स्वत: मैदानात उतरून खेळत नसला, तरीही तो मैदानाबाहेरून आपली भूमिका उत्तमरित्या बजावताना दिसतो. अतिशय अँक्टिव्ह असणाऱ्या आशिष नेहराच्या मानधनाबद्दल आणि संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
आशिष नेहरा हा कोट्यवधींचा मालक आहे. तो इतर खेळाडूंप्रमाणे जास्त समालोचन, जाहिराती करत नाहीत किंवा सोशल मीडियावरही सक्रिय नसतो. पण तरीही तो विविध माध्यमातून भरघोस कमाई करतो. आशिष नेहराची एक क्रिकेट अकादमी असून त्याच्या विविध ठिकाणी शाखा आहेत.
नेहराने नोएडा येथे पहिले केंद्र उघडून स्वतःची अकादमी स्थापन केली. मोठ्या शहरांमध्ये त्याच्या अकादमीची फी ४५०० ते ५२०० रुपये होती, तर प्रयागराज आणि गोरखपूरसारख्या लहान शहरांत फी १६०० ते २८०० रुपये होती. आशिष नेहराच्या क्रिकेट अकादमीची ही रणनीती यशस्वी ठरली.
तसेच क्रिकेट अकादमीसोबतच आशिष नेहरा आणि कुटुंबीयांचा हॉस्पिटॅलिटी व्यवसाय आहे, रेस्टॉरंटमध्येही गुंतवणूक आहे. त्यांची दिल्लीत दोन बडी रेस्टॉरंट्स आहेत. आयपीएलच्या हंगामादरम्यान, नेहराच्या रेस्टॉरंटमध्ये तो अनेकवेळा आयपीएल डिनर्सचेही आयोजन करताना दिसतो.
आशिष नेहराच्या संपत्तीचे मुख्य स्रोत म्हणजे त्याची क्रिकेट अकादमी, रेस्टॉरंट व्यवसाय आणि गुजरात टायटन्सकडून मिळणारी वार्षिक कमाई आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, या व्यवसायांमधून मिळणारे एकत्रित वार्षिक उत्पन्न ७१ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
आयपीएलमध्ये आशिष नेहरा गुजरात टायटन्सच्या विजयासाठी कायमच योग्य रणनीती आखतो आणि वेळोवेळी खेळाडूंना सीमारेषेबाहेरून मार्गदर्शन करतो. एका अहवालानुसार, आशिष नेहरा गुजरात टायटन्सच्या प्रत्येक हंगामासाठी सुमारे ३ कोटी ५० लाख रुपयांचे मानधन घेतो.