गंगाखेडजवळ दोन ट्रॅव्हल्समध्ये ओव्हरटेकची स्पर्धा; नियंत्रण सुटून एक उलटली, ६ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:34 IST2026-05-07T14:33:56+5:302026-05-07T14:34:45+5:30
गंगाखेड-सोनपेठ मार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; जखमींमध्ये पुसद आणि पुण्याच्या प्रवाशांचा समावेश.

गंगाखेडजवळ दोन ट्रॅव्हल्समध्ये ओव्हरटेकची स्पर्धा; नियंत्रण सुटून एक उलटली, ६ प्रवासी जखमी
-सुनील कोनार्डे
गंगाखेड (जि. परभणी): नांदेड-परळी राज्य मार्गावरील करम तांडा पाटीजवळ गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एक खासगी ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. पुण्यावरून नांदेडकडे जाणारी यशस्वी ट्रॅव्हल्स (क्र. एमएच ०१ सीव्ही ०७००) हिला खुशाल इंद्रायणी ट्रॅव्हल्सने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी समोरून अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाने जोरात ब्रेक लावला, ज्यामुळे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला उलटली.
सहा प्रवासी जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक
या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये निशांत निळकंठ वानखेडे (२६, रा. नांदेड), गणेश काशीराम चव्हाण (५०, रा. मांडवा), लीला भानुदास वांजळे (रा. पुणे), नितीन सदाशिव वाहुळे (३२, रा. पुणे), सयाबाई गणेश चव्हाण (४५, रा. मांडवा) आणि ताई सदाशिव वाव्हळे (४५, रा. पुणे) यांचा समावेश आहे. यापैकी निशांत वानखेडे आणि गणेश चव्हाण यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.
पोलिसांची धाव आणि बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार राजेश मस्के आणि उपनिरीक्षक कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने क्रेन बोलावून वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.