OTP आला पण सिलिंडर मिळेना! परभणीच्या बोरीमध्ये पहाटे ५ वाजेपासून ग्राहकांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:14 IST2026-04-17T15:58:48+5:302026-04-17T16:14:38+5:30
बोरी परिसरात गॅस सिलिंडरचा खडखडाट; १५ दिवसांपासून ग्राहक वेटिंगवर, एजन्सीसमोर गोंधळाचे वातावरण

OTP आला पण सिलिंडर मिळेना! परभणीच्या बोरीमध्ये पहाटे ५ वाजेपासून ग्राहकांच्या रांगा
- तुकाराम सर्जे
बोरी (जि.परभणी) : एकीकडे गॅस सिलिंडरची टंचाई नसल्याचे बोलले जात आहे. तरी देखील ग्रामीण भागात सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. असेच चित्र जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शुक्रवारी पहावयास मिळाले. एचपी गॅस ग्राहकांना नोंदणीचा ओटीपी येऊन पंधरा दिवस झाले. मात्र, गॅस सिलिंडर मिळत नसल्याने पहाटे पाचपासून एजन्सीसमोर गॅस धारकांनी रांगा लावल्या. अनेकांना गॅस मिळाला नसल्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले.
मागील पंधरा दिवसांपासून बोरी परिसरात गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे गॅस ग्राहक हैराण झाले आहेत. एजन्सी धारकांनी घरपोच गॅस पुरवठा करावा, असे बंधनकारक असताना सुद्धा गॅस घरपोच मिळत नाही. त्यामुळे ग्राहक बेहाल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी पाच वाजल्यापासून एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. पाचशे गॅस टाक्यांची गाव परिसरात आवश्यकता असताना त्या ठिकाणी फक्त २५० टाक्या उपलब्ध होत्या. त्यामुळे काही ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पंधरा दिवसापासून गॅस संपल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.
गॅस टंचाईचा भडका! ५०० टाक्यांची गरज अन् पुरवठा फक्त २५०; जिंतूर तालुक्यातील बोरीमध्ये पहाटे ५ वाजेपासून रांगा, गॅस ग्राहकांचे हाल. #parabhani#marathwada#lpgshortagepic.twitter.com/yyGWiQZlvP
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 17, 2026
प्रशासनाने हस्तक्षेप करावा
डिझेल टंचाई, गॅस टंचाई अशा समस्यामुळे बोरी ग्रामस्थ त्रस्त आहेत. इतर ठिकाणी गॅसचा पुरवठा सुरळीत होत असून बोरी या ठिकाणी तुटवडा जाणवत आहे. ही बाब प्रशासनाने लक्षात घेऊन येथील गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. याबाबत संबंधित एचपी एजन्सी धारकांशी संपर्क केला असता त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही. बोरी येथील एजन्सी धारकाकडे परिसरातील अनेक गावांतील ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. या ठिकाणी मुबलक गॅसचा पुरवठा करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.