'मी बायकोचा खून केला'; पोलिस ठाणे गाठून पतीची कबुली, तपासात धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:58 IST2026-05-06T11:55:47+5:302026-05-06T11:58:07+5:30
पहाटे शेतात नेऊन पत्नीची हत्या; जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील धक्कादायक घटना

'मी बायकोचा खून केला'; पोलिस ठाणे गाठून पतीची कबुली, तपासात धक्कादायक माहिती उघड
- फैसल देशमुख
चारठाणा (जि. परभणी): जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे बुधवारी पहाटे संशयातून पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. सुमित्रा श्रीधर गायकवाड (वय ३८) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असा घडला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीधर गायकवाड याने बुधवारी पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास पत्नी सुमित्रा हिला दुचाकीवर बसवून जिंतूर-जालना महामार्गालगत असलेल्या आपल्या शेतातील आखाड्यावर नेले. तेथे पोहोचल्यावर त्याने प्रथम काठीने तिला मारहाण केली आणि त्यानंतर रागाच्या भरात डोक्यात मोठा दगड घालून तिचा जागीच खून केला.
स्वतःच पोलीस ठाणे गाठले
कृत्य केल्यानंतर आरोपीने पळून न जाता थेट चारठाणा पोलीस ठाणे गाठले आणि तेथे संपूर्ण प्रकार सांगून गुन्ह्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे आणि बीट जमादार उद्धव माने, उद्धव सातपुते तसेच गुप्तचर विभागाचे उमेश बारहाते घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.