भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 09:11 IST2026-05-11T09:08:58+5:302026-05-11T09:11:47+5:30

Shanghai Archery World Cup 2026: शांघाय तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

Archery World Cup 2026 Shanghai: Indian women’s recurve team stuns China to win gold medal | भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा

भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा

रविवारी शांघाय येथे पार पडलेल्या शांघाय तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिलांनी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहद यांचा समावेश असलेल्या भारतीय त्रिकुटाने यजमान चीनचा अटीतटीच्या शूट-ऑफमध्ये पराभव केला. या सुवर्णपदकासह भारताने एकूण दोन पदकांसह शांघाय तिरंदाजी स्पर्धेची सांगता केली. शनिवारी भारताच्या साहिल जाधवने देशासाठी कांस्यपदक पटकावले.

स्पर्धेत चौथे मानांकन लाभलेल्या भारतीय संघासमोर दुसरे मानांकन असलेल्या आणि घरच्या मैदानात खेळणाऱ्या चीनच्या बलाढ्य संघाचे (झू जिंगयी, हुआंग युवेई आणि यू ची) मोठे आव्हान होते. चार सेट्सचा खेळ पूर्ण झाला, तेव्हा दोन्ही संघ ४-४ अशा बरोबरीवर होते. सामना सुवर्णपदकासाठी असल्याने शूट-ऑफचा थरार पाहायला मिळाला. शूट-ऑफमध्ये भारताने संयमी खेळ करत २८-२६ अशा फरकाने विजय मिळवला. अंकिता भकतने ९ गुणांनी सुरुवात केली. तर, कुमकुमने अचूक १० गुणांचा वेध घेतला. शेवटच्या क्षणी विजयासाठी ८ गुणांची गरज असताना, अनुभवी दीपिका कुमारीने ९ गुणांची नोंद करत भारताचे सुवर्णपदक निश्चित केले.

हे सुवर्णपदक या खेळाडूंसाठी वैयक्तिकरीत्याही महत्त्वाचे ठरले आहे. दीपिका कुमारीच्या कारकिर्दीतील हे ३९वे विश्वचषक पदक ठरले. अंकिता भकतने आठव्यांदा विश्वचषक पदकावर नाव कोरले. तर, कुमकुम मोहद हिच्या कारकिर्दीतील हे पहिले विश्वचषक आहे.

Web Title : भारतीय महिला तीरंदाजों ने जीता स्वर्ण, शंघाई विश्व कप में चीन को हराया

Web Summary : दीपिका कुमारी सहित भारत की महिला तीरंदाजों ने शंघाई विश्व कप में रोमांचक शूट-ऑफ में चीन को हराकर स्वर्ण पदक जीता। साहिल जाधव ने भी कांस्य पदक जीता, जिससे भारत ने दो पदक हासिल किए। यह दीपिका का 39वां, अंकिता का आठवां और कुमकुम का पहला विश्व कप पदक है।

Web Title : Indian Women Archers Win Gold, Beat China in Shanghai World Cup

Web Summary : India's women archers, including Deepika Kumari, secured a gold medal at the Shanghai World Cup, defeating China in a thrilling shoot-off. Sahil Jadhav also won a bronze, contributing to India's two-medal haul. This marks Deepika's 39th World Cup medal, Ankita's eighth, and Kumkum's first.