छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 07:08 IST2026-05-11T07:06:52+5:302026-05-11T07:08:39+5:30
शेतकऱ्यासह दोन्ही मुले विहिरीत उतरली होती, त्याचवेळी काळाने झडप घातली आणि तिघांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये ही घटना घडली.

छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
सिल्लोड : नव्याने बांधलेल्या विहिरीच्या कठड्यांवर पाणी मारण्यासाठी नादुरुस्त झालेला विद्युतपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यासह दोन्ही मुले विहिरीत उतरली आणि काळाने घाला घातला. अचानक विहीर ढासळल्याने बापासह दोन्ही मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री ९.३० वाजता सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाणी लागल्याने कुटुंब होते आनंदित
बाजीराव सर्जेराव काकडे (वय ४९), श्याम बाजीराव काकडे (वय २२), अजिनाथ बाजीराव काकडे (वय २६, सर्व रा. धानोरा, ता. सिल्लोड), अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत. ऐन उन्हाळ्यात विहिरीला चांगले पाणी लागल्याने काकडे कुटुंब आनंदी होते; परंतु हा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. शेजारीपाजारी देखील आनंदीत झाले होते. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नीने फोडला टाहो
रात्री १२ वाजेपर्यंत बाप-लेक तिघेही घरी न परतल्याने काकडे यांची पत्नी मीराबाई त्यांना बोलावण्यासाठी गेल्या असता कड्यांसह विहीर ढासळल्याचे त्यांनी पाहिले आणि एकच टाहो फोडला. यानंतर ग्रामस्थ, नातेवाईक, तसेच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
सहा तासांनंतर मृतदेह बाहेर
मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७वाजेपर्यंत बचाव पथकाने दोन पोकलेनच्या साह्याने मातीचा ढिगारा हटवून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. तिघा बापलेकांचा मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनानंतर रविवारी सकाळी ११.३० वाजता धानोरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.