Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 07:51 IST2026-05-11T07:49:43+5:302026-05-11T07:51:28+5:30
विधानसभा निवडणुकीत जोरदार यश मिळाल्यानंतर आता काँग्रेसमधून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
नवी दिल्ली : केरळमध्येकाँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला विधानसभा निवडणुकीत जोरदार यश मिळाल्यानंतर आता काँग्रेसमधून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात असून, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांचीही नावे चर्चेत आहेत.
चेन्निथला हे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. त्यांना प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे. शिवाय ते केरळमध्ये गृहमंत्रीही होते. त्यांच्याकडे काही विरोधी पक्षनेतेपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
दिल्लीत झाली बैठक, चर्चा काय?
पक्षांतर्गत समीकरणे आणि मित्रपक्षांचा पाठिंबा लक्षात घेता अंतिम निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विविध गटांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली जाईल, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली.
शनिवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन, ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सनी जोसेफ उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासह पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. व्ही. डी. सतीशन यांना पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्याचा मोठा पाठिंबा असल्याचे मानले जाते.
वेणुगोपाल यांचे नावही चर्चेत
लोकसभेत अलाप्पुझाचे प्रतिनिधित्व करणारे के. सी. वेणुगोपाल यांचे नाव चर्चेत आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यास अलाप्पुझा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे या विषयावर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली.