Market Cap: मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण पाहायला मिळालं असून प्रमुख निर्देशांकांनी वाढ नोंदवली आहे. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा 'सेंसेक्स' ४१४.६९ अंकांनी म्हणजेच ०.५३ टक्क्यांनी वधारून बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 'निफ्टी ५०' निर्देशांक १७८.६ अंकांच्या म्हणजेच ०.७४ टक्क्यांच्या वाढीसह स्थिरावला. या तेजीच्या लाटेत देशातील सर्वात मौल्यवान १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण ४६,६८५.६१ कोटी रुपयांची भर पडली, तर उर्वरित ४ कंपन्यांच्या मूल्यामध्ये एकूण १,०९,७१७.५४ कोटी रुपयांहून अधिक घट झाली.
भारतीय स्टेट बँक (SBI) च्या गुंतवणूकदारांना या काळात सर्वाधिक नुकसानीचा सामना करावा लागला आहे. एसबीआयच्या बाजार भांडवलात मागील आठवड्यात ४४,७२२.३४ कोटी रुपयांची मोठी घसरण झाली असून ते ९,४१,१०७.६२ कोटी रुपयांवर आले आहे. त्यापाठोपाठ भारती एअरटेलचे मूल्यांकन ३१,१६७.१ कोटी रुपयांनी कमी होऊन ११,१८,०५५.०३ कोटी रुपयांवर आलं.
टीसीएसच्या बाजारमूल्यात घट
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसच्या बाजार मूल्यामध्ये २८,४५६.२६ कोटी रुपयांची घट झाली असून ते ८,६६,४७७.६९ कोटी रुपये झालं आहे. तसेच लार्सन अँड टुब्रो (L&T) च्या मूल्यांकनात ५,३७१.८४ कोटी रुपयांची घट नोंदवण्यात आली असून ते ५,४६,६२१.२१ कोटी रुपयांवर आलं.
'या' कंपन्यांच्या गुंतवणूकदारांची चांदी
दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एलआयसीच्या गुंतवणूकदारांची मात्र चांदी झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या बाजार भांडवलात सर्वाधिक १५,४२५.०९ कोटी रुपयांची वाढ झाली असून ते आता १२,०२,६९९.२६ कोटी रुपयांवर पोहोचलंय. बजाज फायनान्सचं बाजार भांडवल ११,४८६.८९ कोटी रुपयांनी वाढून ५,९४,६१०.०२ कोटी रुपये झालं. तर हिंदुस्तान युनिलिव्हरच्या मूल्यांकनात ८,७६३.९७ कोटी रुपयांची भर पडल्यानं ते ५,३७,५६२.९८ कोटी रुपयांवर पोहोचलं.
याव्यतिरिक्त, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार मूल्यामध्ये ६,५६३.२८ कोटी रुपयांची वाढ होऊन ते १९,४२,८६६.५८ कोटी रुपये झाले आहे. एलआयसीचं बाजार भांडवल २,७५१.३७ कोटी रुपयांनी वाढून ५,०७,५४९.४४ कोटी रुपयांवर पोहोचलं. आयसीआयसीआय बँकेच्या बाजार भांडवलातही १,६९४.६१ कोटी रुपयांची भर पडली असून ते आता ९,०६,६७५.३९ कोटी रुपयांवर स्थिरावले आहे. एकूणच, मागील आठवडा काही मोठ्या कंपन्यांसाठी फायदेशीर ठरला, तर काही दिग्गज कंपन्यांच्या मूल्यांकनात मोठी घसरण पाहायला मिळाली.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
