पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 08:37 IST2026-05-04T08:36:49+5:302026-05-04T08:37:20+5:30
West Bengal Assembly Election Results: पश्चिम बंगालमध्ये यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षातील भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली आहे. त्यातही बंगालमधील भाजपाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी थेट ममता बॅनर्जींना आव्हान दिल्याने राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील निकालांकडे सर्वांचं लक्ष आहे.

पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगालवर संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षातील भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली आहे. त्यातही बंगालमधील भाजपाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी थेट ममता बॅनर्जींना आव्हान दिल्याने राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील निकालांकडे सर्वांचं लक्ष आहे.
पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते शुभेंदू अधिकारी हे यावेळी नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या शुभेंदू अधिकारी यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसचे पवित्र कर यांचं आव्हान आहे. पवित्र कर हे शुभेंदू अधिकारी यांचेच एकेकाळचे सहकारी आहेत. त्यामुळे येथे अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. २०२१ च्या निवडणुकीत नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी लढत झाली होती. त्यात शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता.
पश्चिम बंगालमध्ये हायहोल्टेज लढत झालेला सर्वात मोठा मतदारसंघ आहे तो म्हणजे भवानीपूर. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमध्ये शुभेंदू अधिकारी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत भाजपाने येथील लढतीत रंगत आणली आहे. इथे अखेरच्या क्षणापर्यंत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये ईर्षेने प्रचार झाला होता. त्यामुळे इथला निकाल हा बंगालचं भवितव्य ठरवणारा ठरू शकतो.
पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ पैकी २९३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये अटीतटीची लढत झाल्याने तसेच दोन्ही टप्प्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याने निकाल काय लागणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.