राजधानी दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, पाकिस्तानी हँडलर्सच्या होते संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 05:45 IST2026-02-23T05:44:22+5:302026-02-23T05:45:53+5:30
आयएसआय-बांगलादेशी कनेक्शन : ८ जण अटकेत; डझनभर मोबाइल, सिम कार्ड केंद्रीय तपास यंत्रणांकडून जप्त

राजधानी दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, पाकिस्तानी हँडलर्सच्या होते संपर्कात
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या ८ संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी रविवारी अटक केली. या संशयितांमध्ये काही बांगलादेशींचा समावेश आहे. संशयित पाकिस्तानची आयएसआय व बांगलादेशातील काही दहशतवादी संघटनेशी निगडित हँडलर्सच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे.
धार्मिक, वारसा स्थळांच्या सुरक्षेत वाढ
दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाल्यानंतर दिल्लीतील प्रमुख धार्मिक व वारसा स्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आयईडी बॉम्बचा वापर करून दहशतवादी हल्ला होण्याची भीती गुप्तचर यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली होती.
डझनभर मोबाइल, सिम कार्ड जप्त
संभाव्य हल्ल्यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तामिळनाडूतून सहा जणांना अटक केली. देशाच्या विविध भागांत विध्वंसक कारवायांचा कट करत असल्याचा संशय असलेल्या मॉड्यूलबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या संशयितांकडून डझनभर मोबाइल, सिम कार्ड जप्त केले आहेत.