आखातात तणाव, संसदेत सोमवारी रणकंदन होणार, जयशंकर दोन्ही सभागृहात उत्तर देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 00:29 IST2026-03-09T00:28:39+5:302026-03-09T00:29:10+5:30
Iran War: अमेरिका आणि इस्राईलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धामुळे आखातामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच या युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर विपरित परिणाम झाल्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी आयातीवर अवलंबून असलेल्या भारताची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

आखातात तणाव, संसदेत सोमवारी रणकंदन होणार, जयशंकर दोन्ही सभागृहात उत्तर देणार
अमेरिका आणि इस्राईलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धामुळे आखातामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच या युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर विपरित परिणाम झाल्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी आयातीवर अवलंबून असलेल्या भारताची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आखातामधील संघर्षाबाबत भारताने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अशा परिस्थिती विरोधकांकडून केंद्र सरकारची सातत्याने कोंडी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे संसदेमध्ये उत्तर देणार आहेत. सकाळी ११ वाजता राज्यसभेमध्ये आणि दुपारी १२ वाजता लोकसभेमध्ये जयशंकर हे इराण युद्ध आणि आखातामधील तणावाबाबत भारत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
दरम्यान, सोमवारी संसदेमध्ये उत्तर देताना जयशंकर हे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. तसेच या भाषणामध्ये खालील तीन प्रमुख मुद्द्यांवर जयशंकर यांचं विशेष लक्ष राहण्याची शक्यता आहे. त्यातील पहिला मुद्द्या म्हणजे आखाती देशांमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसंदर्भात असेल. सध्या सुमारे १ कोटी भारतीय नागरिक हे आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत. युद्धामुळे अनेक जण तिथे अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी सरकार काय करणार आहे हे जयशंकर यांना सांगावं लागणार आहे.
जयशंकर यांच्या भाषणातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे आखातातील तणावामुळे भारतासमोर उभं राहण्याची शक्याता असलेलं तेल संकट. सध्या भारत आपल्या गरजेपैकी ९० टक्के खनिज तेल हे आयात करतो. त्यामधील बहुतांश भाग हा आखातामधूनच येतो. मात्र इराणने युद्धाला तोंड फुटल्यावर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी केल्याने या तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे, अशा परिस्थितीत भारताकडे तेलाचा किती साठा आहे आणि या तेल संकटावर तोडगा काढण्यासाठी भारत सरकार काय उपाययोजना करणार आहे, याबाबत जयशंकर यांचं उत्तर महत्त्वाचं ठरणार आहे.
याबरोबरच जागतिक राजकारणातील मुत्सद्देगिरीमध्ये संतुलन साधण्याचं आव्हानही भारतासमोर उभं राहिलं आहे. सध्या भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झालेला असा तरी भारताचे इस्राइलसोबत चांगले संबंध आहेत. तसेच भारताचं इराणसोबतही वैर नाही आहे. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींचा दौरा आटोपल्यानंतर लगेचच इस्राइलने इराणवर हल्ला केल्याने भारत सरकारसमोर गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे. अशा परिस्थितीत हा संघर्ष थांबवण्यासाठी भारत मध्यस्थी करणार की तटस्थ भूमिका घेणार याबाबत जयशंकर यांचं उत्तर महत्त्वाचं ठरणार आहे.