'त्या' 8 खासदारांचे निलंबन मागे; जाणून घ्या भाजप-काँग्रेसच्या 'सीजफायर'ची INSIDE STORY
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:27 IST2026-03-17T14:23:08+5:302026-03-17T14:27:39+5:30
भाजपनेच मांडला काँग्रेस खासदारांचे निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव!

'त्या' 8 खासदारांचे निलंबन मागे; जाणून घ्या भाजप-काँग्रेसच्या 'सीजफायर'ची INSIDE STORY
नवी दिल्ली: लोकसभेत अध्यक्षांच्या आसनावर कागद फाडून फेकल्याच्या घटनेनंतर निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षातील आठ खासदारांचे निलंबन अखेर रद्द करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात झालेल्या चर्चेनंतर ‘सीजफायर’ झाल्याने संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला, जो ध्वनिमताने मंजूर झाला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी तत्काळ प्रभावाने निलंबन समाप्त झाल्याची घोषणा केली.
प्रश्नकालानंतर घडामोडींना वेग
मंगळवारी प्रश्नकालानंतर अध्यक्ष ओम बिरला यांनी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजूंना प्रस्ताव मांडण्यास सांगितले. त्यानंतर काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी निलंबन मागे घेण्याची मागणी केली. यावर अध्यक्षांनी सभागृहाची मर्यादा राखण्याबाबत सर्व पक्षांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.
Lok Sabha adopts motion for revoking suspension of eight Opposition members https://t.co/T25bqZtTjhpic.twitter.com/yNlGUXmRSg
— ANI (@ANI) March 17, 2026
विरोधकांकडून स्पष्ट हमीची मागणी
यादरम्यान, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार नेहमी संवादासाठी तयार आहे. त्यांनी सभागृह सर्वोच्च असल्याचे नमूद करत नियमांचे पालन करण्यावर भर दिला. जनतेने खासदारांना गोंधळ घालण्यासाठी नाही, तर लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विरोधकांकडून सभागृह सुरळीत चालवण्यासाठी स्पष्ट आश्वासन मागितले.
विरोधकांचे ठोस आश्वासन
यावर काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी सांगितले की, सर्व पक्षांमध्ये झालेल्या बैठकीत सभागृह सुरळीत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभागृहात प्लेकार्ड्स न आणणे, मकरद्वारावर आंदोलन न करणे आणि कामकाजात सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आणि निलंबन मागे घेण्याची विनंती केली. तर, समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनीही सभागृहाची मर्यादा ओलांडणार नाही, असे स्पष्ट केले.
13 जागा मिळवूनही भाजप राज्यसभेत बहुमतापासून दूर; अजून किती जागा लागणार? जाणून घ्या....
अध्यक्षांचा संयमाचा संदेश
अध्यक्ष ओम बिरला यांनी संसदेला “लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर” संबोधत सर्व सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा जपावी, असे आवाहन केले. तसेच संसद परिसरात फेक फोटो, एआय-निर्मित प्रतिमा किंवा बॅनर-पोस्टरचे प्रदर्शन टाळण्याचे निर्देश दिले.
ध्वनिमताने प्रस्ताव मंजूर
यानंतर किरेन रिजिजू यांनी नियम 374(2) अंतर्गत निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव ध्वनिमताने मंजूर झाला. अध्यक्षांनी तत्काळ प्रभावाने आठही खासदारांचे निलंबन समाप्त झाल्याची घोषणा केली.
निलंबित खासदार कोण होते?
निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे मणिक्कम टागोर, अमरिंदर सिंह राजा वडिंग, गुरजीत सिंह औजला, हिबी ईडन, डीन कुरियाकोस, प्रशांत पडोले, किरण कुमार रेड्डी तसेच डाव्या पक्षाचे एस. वेंकटेशन यांचा समावेश होता.