VIDEO: मॉर्निंग वॉक करणाऱ्या ३ महिलांना कारने चिरडले; धडकेनंतर २० फूट अंतरावर पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:40 IST2025-10-04T18:33:28+5:302025-10-04T18:40:33+5:30
उत्तर प्रदेशात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या महिलांना एका कारने चिरडले ज्यात तिघांचा मृत्यू झाला.

VIDEO: मॉर्निंग वॉक करणाऱ्या ३ महिलांना कारने चिरडले; धडकेनंतर २० फूट अंतरावर पडून मृत्यू
Gaziyabad Accident:उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये शनिवारी एक दुर्दैवी अपघात घडला. पहाटे गाझियाबादमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या तीन महिलांना एका कारने चिरडले. कारची धडक इतकी जोरदार होती की त्या महिला काही अंतरावर फेकल्या गेल्या. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एकीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक जण जखमी झाला आहे. या भयानक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे ज्यामध्ये भरधाव कार महिलांना चिरडताना दिसत आहे.
गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस ठाण्याच्या परिसरातील राकेश मार्ग कटजवळ अनेक लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. मात्र तितक्या एका भरधाव टोयोटा ग्लांझा कारने महिलांना धडक दिली ज्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. मीनू प्रजापती (५६), कमलेश (५५) आणि सावित्री देवी (६०) अशी मृतांची नावे आहेत. विपिन शर्मा (४७) असे जखमीचे नाव आहे.
या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्या एका दुभाजकाजवळ उभ्या होत्या. तितक्यात एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली आणि दुभाजकावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की त्या महिला दूर फेकल्या गेल्या आणि गाडीच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला.
🚨Uttar Pradesh, Ghaziabad – Three women going for a morning walk were hit by a car at Rakesh Marg Cut. Two of them lost their lives, while one sustained serious injuries. pic.twitter.com/EzX1tzhHEY
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) October 4, 2025
पोलिसांनी सांगितले की, जीटी रोडवरील राकेश मार्गावर एका चारचाकी वाहन चालकाने चार पादचाऱ्यांना धडक दिल्याची माहिती मिळाली होती. चालक घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याची कार पोलिसांच्या ताब्यात आहे. तपासात चालक हा नेहरू नगरचा रहिवासी असून त्याचे नाव राकेश शर्मा आहे. प्राथमिक तपासात तो झोपेत होता आणि त्यामुळे हा अपघात झाला. अपघातात त्यालाही दुखापत झाली आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.