धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 22:59 IST2026-05-07T22:56:40+5:302026-05-07T22:59:27+5:30
ही घटना घडत असताना तिथे अनेक पत्रकार आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चेरियन फिलिप यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
केरळच्या तिरुवनंतपुरममधील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप यांनी पक्षाच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीपूर्वी, निवडून आलेल्या एका महिला आमदाराला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. बिंदू कृष्णा असे या महिला आमदाराचे नाव आहे. दरम्यान, आमदार बिंदू कृष्णा या प्रचंड अस्वस्थ दिसून आल्या.
नेमकं काय घडलं? -
ही घटना काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घडली. ४८ वर्षीय बिंदू कृष्णा या पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या साडीत बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्या. तेथे उपस्थित मीडिया प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी त्या हस्तांदोलन करत होत्या. याचवेळी त्या ७१ वर्षीय चेरियन फिलिप यांच्याजवळ पोहोचल्या. बिंदू यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असता, फिलिप यांनी त्यांच्या गळ्यात हात टाकून त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिंदू यांनी तातडीने त्यांचा हात खाली केला आणि त्यांना मागे ढकलले. मात्र, तरीही फिलिप यांनी पुन्हा दुसऱ्यांदा तसाच प्रयत्न केला, यावर बिंदू यांनी हात जोडले आणि त्या अस्वस्थ अवस्थेतच पुढे निघून गेल्या.
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया -
ही घटना घडत असताना तिथे अनेक पत्रकार आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चेरियन फिलिप यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडिया युजर्सनी फिलिप यांच्यावर, महिला आमदाराच्या व्यक्तिगत सीमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणावर दोन्ही नेत्यांकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण या प्रकाराने काँग्रेसमधील अंतर्गत शिस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.