“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 23:43 IST2026-05-07T23:43:30+5:302026-05-07T23:43:44+5:30
Tamil Nadu Election 2026 Politics: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून, राजकीय घडामोडींना वेग घेतल्याचे म्हटले जात आहे.

“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
Tamil Nadu Election 2026 Politics: एकीकडे राज्यपाल सत्तास्थापनेसाठीचा दावा स्वीकारत नसताना दुसरीकडे स्वपक्षीय आमदारांनी अभिनेता विजय याला सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने 'त्रिशंकू' स्थिती निर्माण झाली आहे. सर्वांत मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेने राज्यपालांची भेट घेतली. परंतु, बहुमत नसल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. अभिनेता विजय दोनवेळा लोकभवन येथे जाऊन आला, पण हाती काहीच लागले नाही. यातच आता टीव्हीकेच्या आमदारांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे तामिळनाडूतीलराजकारणात मोठा ट्विस्ट आल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेस आमदारांसह ११२ आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा विजयने केला. असे असूनही, त्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नाही. बहुमतासाठी ११८ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. हा आकडा गाठणे विजय प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे. सरकार स्थापन करण्यासाठी विजय विविध प्रादेशिक पक्षांशी चर्चा करत आहे. यामध्ये व्हीसीके (२ आमदार), डावी आघाडी (२ आमदार) यांचा समावेश आहे, तर मुस्लिम लीगचे २ आमदार असून, त्यांनी विजय यांना पाठिंबा द्यायचा की नाही, हे अद्याप ठरवलेले नाही असे म्हटले आहे.
...तर सामूहिक राजीनामे देऊ
बहुमताचे संख्याबळ जमवण्याच्या प्रयत्नात असतानाच विजयला स्वपक्षीय आमदारांनी इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत डीएमके आणि एआयएडीएमकेचे सरकार स्थापन झाल्यास टीव्हीकेचे सर्व आमदार सामूहिक राजीनामा देतील, असा मोठा इशारा देण्यात आला आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले स्टॅलिन यांचा डीएमके आणि पलानीस्वामी यांचा एआयएडीएमके पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास, निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या विजय यांना मोठा धक्का बसेल. याच पार्श्वभूमीवर विजयच्या आमदारांनी सदर भूमिका घेतल्याचे म्हटले जात आहे.
एआयएडीएमकेचा एक गट विजयला पाठिंबा देण्याच्या तयारीत
एआयएडीएमकेचे २८ आमदार पुदुचेरीच्या पुरणकुप्पम येथील एका खाजगी रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आमदार सध्या रिसॉर्टमध्येच आहेत. मात्र, त्यांना तिथे का ठेवण्यात आले आहे किंवा पक्षाची भविष्यातील रणनीती काय असेल, यावर कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. अशी चर्चा सुरू आहे की, हे आमदार विजय यांना पाठिंबा देण्यासाठी पक्ष सोडूनही जाऊ शकतात.
राज्यपालांचे आश्वासनच विजयला दिलासादायक
पीटीआयच्या वृत्तानुसार, सरकार स्थापन करण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाला आमंत्रित करणार नाही, असे आश्वासन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना दिले आहे. तसेच सत्तास्थापनेसाठी एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. विजय यांनी त्यांच्या समर्थक आमदारांच्या सह्यांची यादी घेऊन परत यावे. प्रत्येक आमदाराच्या सह्यांची यादी सादर केल्याशिवाय शपथविधीची प्रक्रिया पुढे जाणार नाही. पाठिंब्याचा दावा कागदोपत्री पूर्णपणे ठोस असला पाहिजे. सत्ता स्थापनेनंतर सरकार स्थिर राहावे, शपथविधीनंतर ते लगेच कोसळू नये, असेही राज्यपालांनी म्हटल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, २०१९ मध्ये महाराष्ट्रात जे घडले, तेच आता तामिळनाडूमध्ये घडू शकते, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाल्याची चर्चा आहे. एआयएडीएमकेने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. डीएमके आणि एआयएडीएमके यांचे पक्षीय बलाबल पाहता, निवडणुकीत डीएमकेने ५९ जागा जिंकल्या, तर एआयएडीएमकेने ४७ जागा जिंकल्या. या दोन पक्षांनी युती केली, तर जागांची संख्या १०६ पर्यंत जाऊ शकते. परंतु, ११८ जागांच्या बहुमताच्या आकड्यापेक्षा ही संख्या १२ जागांनी कमी आहे. त्यामुळे, सरकार स्थापन करण्यासाठी या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना इतर पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागेल.