ruckus in ito during tractor parade death of farmer allegations of firing on delhi police | शेतकरी आंदोलन चिघळले! आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण

शेतकरी आंदोलन चिघळले! आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली आहे. मात्र आंदोलक शेतकरी आणि पोलीस काही ठिकाणी आमने-सामने आले असून हे शेतकरी आंदोलन चिघळले आहे. दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता दिल्ली-एनसीआरच्या काही भागात इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनादरम्यान दिल्लीतील आयकर कार्यालयाजवळ (ITO) एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत सिंह असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे. नवनीत हे उत्तराखंडच्या रुद्रपूर येथील बाजपूर गावाचे रहिवासी आहेत. ट्रॅक्टरसोबत स्टंट करत असताना आंदोलकाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र गोळी लागल्याने या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा दावा उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांकडून हा गोळीबार करण्यात आल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दीन दयाळ उपाध्याय मार्गावर ही घटना घडली आहे. 

एक ट्रॅक्टर या मार्गावर पलटलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृत शेतकरी ट्रॅक्टरवर स्वार असल्याचं सांगितलं जात आहे. आंदोलनकर्त्यांकडून एका डीटीसी बसची तोडफोडही करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे, याच दरम्यान आता ही ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीस चक्क रस्त्यावरच बसलेले पाहायला मिळत आहे.

 ...अन् पोलिसांनी चक्क रस्त्यावर बसून केला ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न

नांग्लोई भागातील मुख्य रस्त्यावरुन शेतकऱ्यांची नियोजित ट्रॅक्टर परेड जाणार होती. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरुन ही परेड रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर या मार्गावरुन जाणारी ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीस बळाचा वापर न करता पोलीस रस्त्यावर बसलेले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याचे काही फोटो ट्विट करून माहिती दिली आहे. अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड तोडले आहेत. यामुळे पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला. दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अक्षरधामच्या आधी पोलिसांनी बॅरिकेड लावले होते. मात्र, काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बॅरिकेड तोडून दिल्लीकडे घुसण्याचा प्रयत्न केला.


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ruckus in ito during tractor parade death of farmer allegations of firing on delhi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.