रेल्वे पोलिसांची अरेरावी; सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचे लाखो रुपयांचे साहित्य ट्रेनमधून रुळावर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:15 IST2026-05-06T16:07:37+5:302026-05-06T16:15:12+5:30

रेल्वे पोलिसांनी आंध्र प्रदेशात खेळाडूंच्या महागड्या पोल्सची दोरी चाकूने कापली

RPF Personnel Throw Tamil Nadu Athletes Poles Worth Lakhs Out of Moving Train in Andhra Pradesh | रेल्वे पोलिसांची अरेरावी; सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचे लाखो रुपयांचे साहित्य ट्रेनमधून रुळावर फेकले

रेल्वे पोलिसांची अरेरावी; सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचे लाखो रुपयांचे साहित्य ट्रेनमधून रुळावर फेकले

देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना  कोणत्या प्रकारच्या वागणुकीला सामोरे जावे लागते, याचे संतापजनक उदाहरण समोर आले आहे. ओडिशातून राष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकून परतणाऱ्या तमिळनाडूच्या पोल वॉल्ट खेळाडूंचे महागडे साहित्य रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिले. आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री स्थानकावर ही घटना घडली असून, खेळाडूंना साखळी ओढून आपले साहित्य वाचवावे लागले.

तमिळनाडूचे पाच खेळाडू भुवनेश्वर येथे झालेल्या इंडियन इनडोअर ओपन स्पर्धेत सहभागी होऊन शालीमार एक्सप्रेसने सालेम येथे परतत होते. या खेळाडूंमध्ये २० वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकणारा कविराजा, रेल्वे कर्मचारी शक्ती महेंद्रन आणि आर. विशाल यांचा समावेश होता. खेळाडूंकडे ८ पोल्स (उडी मारण्यासाठी लागणारे बांबू) होते. एका पोलची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. भुवनेश्वरमध्ये ट्रेन फक्त ५ मिनिटे थांबत असल्याने आणि स्लीपर कोचमध्ये मोठी गर्दी असल्याने, खेळाडूंनी हे पोल्स खिडकीच्या बाहेरून दोरीने व्यवस्थित बांधले होते.

एका प्रवाशाने तक्रार केल्याचे निमित्त साधून राजमहेंद्री स्थानकावर आरपीएफच्या एका अधिकाऱ्याने थेट चाकूने पोल्सला बांधलेली दोरी कापली. त्यामुळे सर्व महागडे पोल्स धावत्या ट्रेनमधून खाली रुळांवर पडले. आपले लाखो रुपयांचे साहित्य खराब होऊ नये म्हणून एका ज्युनियर खेळाडूने तत्काळ तातडीची साखळी ओढली आणि ट्रेन थांबवली.

रेल्वे कर्मचाऱ्यालाही मिळेना सन्मान

महत्त्वाचे म्हणजे, शक्ती महेंद्रन हा स्वतः रेल्वेच्या सालेम विभागात आहे. त्याने सांगितले की, "आम्ही सर्व सुरक्षा खबरदारी घेतली होती, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती. मी माझा रेल्वे आयडी कार्ड दाखवल्यावरही अधिकारी उद्धटपणे वागत होते. अखेर रेल्वेतील सहकाऱ्यांशी बोलणे करून दिल्यानंतर आणि लेखी जबाब दिल्यानंतर रात्री १०:३० वाजता आम्हाला सोडण्यात आले." या गोंधळात खेळाडूंना आपले सामान ट्रेनमध्येच सोडून खाली उतरावे लागले. भाषा न समजल्यामुळे आणि अधिकार्‍यांच्या अरेरावीमुळे खेळाडूंना मनस्ताप सहन करावा लागला.

खेळाडूंचे मनोबल खचले

येत्या आठवड्यात चेन्नई येथे होणाऱ्या इंडियन ओपन सिरीजसाठी हे खेळाडू सज्ज होत आहेत. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे खेळाडूंचे मनोबल खचत आहे. यापूर्वीही राष्ट्रीय विक्रमवीर कुलदीप कुमार आणि देव मीना यांना अशाच प्रकारे ट्रेनमधून उतरवून दंड ठोठावण्यात आला होता.

"जर मी रेल्वेचा कर्मचारी नसतो, तर हे प्रकरण मिटायला आणखी वेळ लागला असता. अशा घटनांमुळे आमचा आत्मविश्वास कमी होतो. जर ते पोल्स तुटले असते तर आमचे मोठे नुकसान झाले असते," असे शक्ती महेंद्रन याने सांगितले. आता याप्रकरणी शक्ती महेंद्रन वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे पत्र लिहून खेळाडूंना प्रवासात होणाऱ्या त्रासाबाबत दाद मागणार आहे.

Web Title : रेलवे पुलिस की गुंडागर्दी: स्वर्ण पदक विजेता खिलाड़ियों का सामान ट्रेन से फेंका

Web Summary : आंध्र प्रदेश में रेलवे पुलिस ने पोल वॉल्ट एथलीटों का सामान ट्रेन से फेंक दिया। सुरक्षा उपायों के बावजूद, अधिकारियों ने एक रेलवे कर्मचारी के आईडी की अनदेखी की, जिससे काफी परेशानी हुई और संभावित रूप से महंगा उपकरण क्षतिग्रस्त हो गया। इस घटना ने आगामी प्रतियोगिता से पहले एथलीटों का मनोबल गिरा दिया है।

Web Title : Railway Police High-Handedness: Athletes' Gear Thrown From Train

Web Summary : Railway police in Andhra Pradesh threw pole vault athletes' equipment from a train. Despite safety measures, officials disregarded a railway employee's ID, causing significant distress and potentially damaging expensive gear. The incident has demoralized the athletes before an upcoming competition.