आम्ही तो नियोजन आयोग बरखास्त करुन..; नेहरू-इंदिरांचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:10 IST2026-02-05T18:09:32+5:302026-02-05T18:10:11+5:30
Parliament Session Narendra Modi: 'काँग्रेसच्या काळात नेत्यांच्या फोनवर मोठमोठी कर्जे दिली जात होती; आम्ही बँकांना ‘आजारपणातून’ मुक्त केले.'

आम्ही तो नियोजन आयोग बरखास्त करुन..; नेहरू-इंदिरांचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
Parliament Session Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.5) राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर पंतप्रधानांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर तीव्र शब्दांत टीका केली. जे लोक थकले, ते बिचारे निघून गेले. पण, कधी ना कधी त्यांना उत्तर द्यावे लागेल की, देशाची अशी अवस्था करून ठेवली होती की, कोणताही देश व्यापार करारासाठी येत नव्हता. यादरम्यान, त्यांनी पं. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला.
काँग्रेसच्या नियोजन आयोगावर टीका
पंतप्रधान मोदींनी नेहरू-इंदिरा गांधी यांचा संदर्भ देत प्लॅनिंग कमिशनवर टीका केली. ते म्हणाले, ज्या नियोजन आयोगावर इंदिरा गांधी टीका करत होत्या, त्याचे जनक स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू होते. काँग्रेसच्या काळात ‘अटकवणे, लटकवणे, भटकवणे’ ही त्यांची कार्यशैली होती. 2014 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर नियोजन आयोग बरखास्त करून आम्ही नीती आयोग स्थापन केला.
देश रिफॉर्म एक्सप्रेसवर धावतोय; संपूर्ण जग भारताच्या ट्रेड डील्सची प्रशंसा करत आहे: PM मोदी
बँकांना आजारपणातून मुक्त केले
पंतप्रधान पुढे म्हणाले, आम्ही बँकांना आजारीपणातून बाहेर काढले. मुद्रा योजनेअंतर्गत 30 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 2014 पूर्वी काँग्रेसच्या काळात नेत्यांच्या फोनवर मोठमोठी कर्जे दिली जात होती, त्यामुळे एनपीए (थकीत कर्जे) सातत्याने वाढत होती, असा आरोप त्यांनी केला. सरकारने बँकिंग क्षेत्रात सुधारणा करत विश्वास निर्माण केला असून, आज एनपीए 1 टक्क्यांपेक्षाही कमी पातळीवर आणण्यात यश आले आहे, असा दावा मोदींनी केला.
मुद्रा लोन, पीएसयूंचा नफा अन् ‘मेक इन इंडिया’चा उल्लेख
पंतप्रधानांनी गॅरंटीविना मुद्रा लोन योजना, तसेच पीएसयूंच्या विक्रमी नफ्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आज सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला बळ देत आहेत. काँग्रेसच्या काळात याच पीएसयू अवस्थेच्या काठावर पोहोचल्या होत्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे दुःख आम्ही जाणतो. काँग्रेसने दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप त्यांनी केला.
भारत विश्वासार्ह जागतिक भागीदार
जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, जग नव्या वर्ल्ड ऑर्डरकडे वाटचाल करत आहे आणि भारताकडे सर्वांच्या केंद्रस्थानी आहे. आज भारत ग्लोबल साऊथचा बुलंद आवाज बनला असून, अनेक देशांसाठी विश्वासार्ह भागीदार ठरल्याचे त्यांनी नमूद केले. एमएसएमई क्षेत्राबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, एमएसएमई नेटवर्क जितके मजबूत, तितकी देशाची आर्थिक ताकद अधिक. सरकारने या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळेच ईयू आणि अमेरिका यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांसोबत ट्रेड डील्स शक्य झाल्या, असा दावा त्यांनी केला.