विराज भागवत
Cheteshwar Pujara Exclusive Interview: लोकप्रियता फार झटपट मिळते. पण, त्यानंतर तो लौकिक टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे असते. नव्या दमाच्या खेळाडूंनी हा लौकिक टिकविण्यासाठी सातत्य राखायला हवे, असा मोलाचा सल्ला 'भारताचा 'विश्वासू' माजी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने दिला. पुजारा सध्या 'जिओहॉटस्टार'वरील 'चॅम्पियन्सवाली कॉमेंट्री'मधून समालोचनही करतो. चॅम्पियन्स वाली कॉमेंट्री हा CTVवरील हिंदीमधील एक विशेष डिजिटल फीड आहे, ज्यामध्ये आयपीएलमधील माजी विजेत्या खेळाडूंसोबत खास किस्से आणि थेट सामना सुरू असताना त्यांच्या मनातील विचार जाणून घेता येतात. त्या बॉक्समधून आजचे क्रिकेट आणि उगवते क्रिकेटपटू कसे दिसतात, याबाबत खास अनुभव पुजाराने 'लोकमत'शी संवाद साधताना सांगितले.
आयपीएलमधून देशाला नवनवे क्रिकेटपटू मिळत असतात. या युवा खेळाडूंचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, झपाट्याने बदलत जाणारे खेळाचे स्वरूप, सततचे क्रिकेट सामने आणि लोकप्रियतेनंतरचे जग यावर त्याने भाष्य केले. या मुलाखतीतील खास अंश असे...
प्रश्न- वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसारखी नवी पिढी क्रिकेटमध्ये आली आहे. हल्ली खूप जास्त क्रिकेट खेळले जाते. अशा वेळी खेळाडूंनी दीर्घकाळ कारकीर्द कशी घडवावी?
पुजारा- वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे यांसारख्या नव्या पिढीच्या खेळाडूंना जर दीर्घकालीन कारकीर्द घडवायची असेल तर त्यांना पाया मजबूत करावा लागेल. टी२०मध्ये खेळण्याचीही एक पद्धत असते. यावर त्यांना कायम काम करत राहावे लागेल. आजकाल तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की एखाद्या फलंदाजाचे जुने व्हिडिओ पाहून उणिवा शोधल्या जातात आणि बाद करायचे पर्याय शोधतात. अशावेळी पाया मजबूत हवा. कारण लोकप्रियता फार झटपट मिळते, पण त्यानंतर तो लौकिक टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे असते. वैभवने गेली दोन वर्षे चांगली कामगिरी करतोय. पण असाच धमाकेदार खेळ तो पुढील ५ हंगामात करू शकला तर तो एक चांगला खेळाडू ते उत्तम खेळाडू हा टप्पा गाठू शकेल.
प्रश्न- युवा खेळाडूंना काय सल्ला देशील?
पुजारा- माझा युवा खेळाडूंना असा सल्ला आहे की, त्यांनी सतत अपडेट राहायला हवे आणि टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहायला हवे. IPL गरजेचे आहेच, पण त्यासोबत भारतीय संघालाही ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी त्यांनी खेळायला हवे. आगामी काळात वनडे विश्वचषक स्पर्धा येणार आहे, टी२० विश्वचषक स्पर्धाही सतत होत असते. या स्पर्धांमध्ये भारताला जिंकवणे हे त्यांनी आपले ध्येय ठेवायला हवे. आणि त्यासोबतच आपापल्या IPL संघाकडूनही चांगली कामगिरी करत राहू दे.
प्रश्न- IPLमधून अनेक युवा टी२० खेळाडू उदयास येत आहेत. अशा वेळी आगामी टी२० संघात सिनियर खेळाडूंना संधी मिळावी का?
पुजारा- कोणत्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीच्या जोरावर संघात स्थान द्यायला हवे. जर नवे खेळाडू चांगले खेळत असतील आणि अनुभवी खेळाडूंची कामगिरी खराब होत असेल. त्यात सुधारणा होत नसेल, तर नक्कीच पर्यायांचा विचार केला जायला हवा. पण जर वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू उत्तम कामगिरी करत असतील, तर अशा वेळी केवळ त्यांचे वय जास्त म्हणून त्यांना संघातून वगळणे योग्य नाही. अशा वेळी ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंचा संघात समतोल साधला जायला हवा.
प्रश्न- क्रिकेटच्या मैदानावर तुला फार बडबड करताना पाहिले नव्हते. समालोचनात खूप बोलावे लागते. याची तयारी कशी केली?
पुजारा- मैदानावर खेळताना तुमच्याकडे कमी वेळ असतो. पण जेव्हा तुम्ही मैदानाबाहेर असता, तेव्हा तुम्ही मित्रांशी जशा गप्पा-गोष्टी करता, तसेच आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो. क्रिकेटबद्दल बोलणे माझ्यासाठी फारसे कठीण नाही, पण एखाद्या खेळाडूचा अभ्यास किंवा अनालिसिस करण्याचा मला अनुभव नव्हता. त्यासाठी मी थोडी मेहनत घेतली. आयपीएलमध्ये युवा, अनुभवी, भारतीय, परदेशी सगळे खेळाडू असतात. त्या सगळ्यांबाबत बोलण्यासाठी त्यांचा अभ्यास गरजेचा असतो. अशा वेळी मी त्या खेळाडूबाबत माहिती करून घेतो. त्याची पद्धत कशी? तो आधी कसा खेळलाय? सध्याची प्रगती काय? याचा मी अभ्यास करतो. त्यानंतर समालोचनाला सुरूवात करतो. तसे केल्याने आम्हाला अधिक रंजक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येते.
प्रश्न- IPL मुळे कसोटी क्रिकेटचा दर्जा घसरतोय का?
पुजारा- आपण असे थेट म्हणू शकत नाही. कारण IPL मुळे आपल्याला नवीन खेळाडू मिळतात. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज किंवा मोहम्मद शमीसारखे खेळाडू आपल्याला IPL मधूनच कसोटी क्रिकेटमध्ये आले आणि मोठे झाले. जर जगाशी स्पर्धा करायची असेल तर टी२० क्रिकेटही महत्त्वाचे आहे.
प्रश्न- IPLमध्ये पूर्वी काही ठराविक संघच टॉप ४ मध्ये असायचे. आता ही स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. त्यावर काय म्हणशील?
पुजारा- सध्या १० संघांमध्ये सुरु असलेली स्पर्धा ही खूपच चांगली आहे. या प्रत्येक संघात आपल्या भारताचे खेळाडू आहेत. जेव्हा सामने अटीतटीचे होतात आणि स्पर्धा अधिक तीव्र होते, त्यावेळी जे दडपण असते त्यातून आपले युवा भारतीय खेळाडू IPL मधूनच तावूनसुलाखून निघतील.
प्रश्न- मुंबई इंडियन्सची खालावलेली कामगिरी यावर काय म्हणशील?
पुजारा- मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब होतेय हे मान्य आहे, पण तो चिंतेचा विषय नाही. त्यांनी लखनौविरूद्ध दमदार विजय मिळवून कमबॅक केले आहे. मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंनी एकत्रित बसून रणनिती आखायची गरज आहे. कधीकधी खेळाडूंचा फॉर्म नसतो, पण ते जेव्हा फॉर्मात येतील तेव्हा त्यांना कुणीही रोखू शकणार नाही.