‘मोहब्बत की दुकान’वाले मोदीची 'कब्र' खोदण्याची भाषा करतात; पंतप्रधानांची राहुल गांधींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:42 IST2026-02-05T18:41:36+5:302026-02-05T18:42:49+5:30
Parliament Session Narendra Modi: 'आमच्या सरकारचे रिमोट कंट्रोल देशातील 140 कोटी लोकांच्या हातात आहे.'

‘मोहब्बत की दुकान’वाले मोदीची 'कब्र' खोदण्याची भाषा करतात; पंतप्रधानांची राहुल गांधींवर टीका
Parliament Session Narendra Modi: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. आम्ही विकसित भारताची पायाभरणी करत आहोत, तर काँग्रेस मोदी 'कब्र' खोदण्याची भाषा करत आहे. ‘मोहब्बत की दुकान’ उघडल्याचा दावा करणारे लोक एखाद्या भारतीय नागरिकाची कब्र खोदण्याची भाषा करतात. ही कोणती मोहब्बत आहे? हे संविधान आणि मानवतेचा अपमान नाही का? असा सवाल पंतप्रधानांनी केला.
विरोधकांचा उघड द्वेष
पंतप्रधानांनी सांगितले की, कलम 370 हटवणे, ईशान्येत शांतता प्रस्थापित करणे, दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून उत्तर देणे, माओवादविरोधी ठोस पावले...या निर्णयांमुळेच काहींना ‘कब्र खोदण्याची’ भाषा सुचते. यातून विरोधकांच्या मनातील द्वेष उघड होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संविधान व संसदीय शिस्तीवर भाष्य
काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा होऊ न शकल्याबद्दल पंतप्रधानांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, हे संविधानाचा अपमान आहे; आदिवासी कुटुंबातून आलेल्या राष्ट्रपतींचाही अपमान आहे. सभागृहात खुर्चीकडे कागद फेकणे, अध्यक्षपदावर बसलेल्या सदस्यांचा अवमान, यावरून संसदीय शिस्तीचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आम्ही तो नियोजन आयोग बरखास्त करुन..; नेहरू-इंदिरांचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
राहुल गांधींच्या ‘गद्दार’ टिप्पणीवर टीका
पंतप्रधानांनी आरोप केला की, काँग्रेसच्या एका खासदाराने(राहुल गांधी) याच संसदेत शीख खासदाराला ‘गद्दार’ म्हटले. हा शीखांचा आणि गुरूंचा अपमान आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबातील सदस्याबाबत अशी भाषा वापरणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
सरदार पटेल, नेहरू-इंदिरा यांचा संदर्भ
सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, नर्मदा धरणाची संकल्पना पटेलांनी मांडली; नेहरूंनी शिलान्यास केला; मात्र उद्घाटन मी केले. यातून काँग्रेसच्या कार्यशैलीचा फरक दिसतो. अटकवणे,लटकवणे,भटकवणे ही काँग्रेसची पद्धत बदलून 2014 नंतर नीति आयोग स्थापन केला. यावेळी पंतप्रधानांनी बस्तर, ईशान्य भारत, जम्मू-उधमपूर-बारामुल्ला रेल्वे मार्ग, बोगीबील पूल, सौरऊर्जा उद्दिष्टे आदींचा उल्लेख करत लटकलेले प्रकल्प मार्गी लावल्याचा दावा केला.
आमचा रिमोट जनतेच्या हाती-मोदी
पंतप्रधानांनी विरोधकांच्या दृष्टिकोनावर टीका करत म्हटले की, काही जण नागरिकांनाच समस्या मानतात. आमची भूमिका वेगळी आहे. 140 कोटी नागरिक म्हणजे 140 कोटी उपाय. आम्हाला असे वाटते की, 140 कोटी देशवासी आव्हानांवर उपाय देऊ शकतात, कारण आम्हाला आमच्या देशवासीयांवर विश्वास आहे. त्यांचे सरकार रिमोट-कंट्रोल्ड होते. माझे सरकारदेखील रिमोट-कंट्रोल्ड आहे. पण, देशातील 140 कोटी लोक आमच्या सरकारचे रिमोट कंट्रोल करतात, असेही पीएम मोदींनी यावेळी म्हटले.