बाहेर पडतानाच लिफ्ट सुरु झाली अन्...; गुजरातमध्ये अपघाताचा हादरवणारा व्हिडीओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 19:40 IST2026-03-03T19:34:21+5:302026-03-03T19:40:18+5:30
गुजरातमध्ये एक लिफ्ट अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बाहेर पडतानाच लिफ्ट सुरु झाली अन्...; गुजरातमध्ये अपघाताचा हादरवणारा व्हिडीओ समोर
Gujarat Elevator Accident: सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास लिफ्ट कशी जीवघेणी ठरू शकते, याचा एक धडकी भरवणारा अनुभव गुजरातच्या वलसाडमध्ये समोर आला आहे. वलसाड येथील सरदार हाईट्स संकुलात लिफ्टमधून बाहेर पडत असतानाच तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अचानक सुरू झाली. या अपघातात वत्सलभाई पांचाल हे गंभीर जखमी झाले असून, एका मोठ्या संकटातून ते सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत.
नेमकी घटना काय?
साबरमती बिल्डिंगमधील या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. वत्सलभाई पांचाल लिफ्टमधून खाली आले होते. लिफ्टचा दरवाजा उघडल्यानंतर ते बाहेर पडणारच होते, इतक्यात लिफ्टमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. वत्सलभाईंचा एक पाय बाहेर असतानाच लिफ्ट अचानक वरच्या दिशेला खेचली गेली. या धक्क्यामुळे वत्सलभाई बाहेरच्या बाजूला फेकले गेले. काही सेकंदांचा जरी उशीर झाला असता, तर वत्सलभाई लिफ्ट आणि भिंतीच्या मध्ये अडकून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने ते बाहेर फेकले गेल्याने त्यांचा जीव वाचला.
अंर्तगत जखमा, पण जीव वाचला
या भीषण घटनेत वत्सलभाईंच्या शरीराला गंभीर अंतर्गत जखमा झाल्या आहेत. लिफ्टमधून बाहेर फेकले गेल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात इतका पटकन झाला की, वत्सलभाईंना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
दिल देहलदेने वाला वलसाड का यह वीडियो लिफ्ट के रखरखाव की कमी को उजागर करता है। दरअसल, गुजरात की कई पुरानी सोसायटीज में खस्ता हाल में ही लिफ्ट चल रही है। जो कभी भी मौत को बुलावा दे सकती है। @sanghaviharshpic.twitter.com/T5vK4tBuhq
— Dixit Soni (@DixitGujarat) March 3, 2026
मेंटेनन्स कंपनीच्या हलगर्जीपणावर संताप
या घटनेनंतर सरदार हाईट्समधील रहिवाशांनी मेंटेनन्स कंपनी आणि सोसायटी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. लिफ्टची स्थिती खराब असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. बाहेर पडण्यापूर्वीच लिफ्ट सुरू होणे हा अत्यंत गंभीर तांत्रिक दोष आहे. मेंटेनन्स कंपनीने वेळेवर तपासणी केली असती, तर वत्सलभाईंचा जीव धोक्यात आला नसता. या घटनेमुळे आता सर्वच मोठ्या सोसायट्यांमधील लिफ्टच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.